Sat, Feb 29, 2020 11:59होमपेज › Belgaon › घरांची पडझड, हृदयात धडधड

घरांची पडझड, हृदयात धडधड

Published On: Sep 08 2019 1:35AM | Last Updated: Sep 08 2019 1:35AM
बेळगाव, खानापूर, चिकोडी : प्रतिनिधी

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसणार्‍या पावसाने कहर केला असून, कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा, हिरण्यकेशी, मार्कंडेयसह जिल्ह्यातील सार्‍याच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कृष्णेवरील कुडची पूल, मलप्रभेवरील मळव पुलासह अनेक पूल शनिवारी पाण्याखाली गेले. कृष्णेच्या पातळीत तीन फुटांनी वाढ झाली आहे, तर मलप्रभेच्या पुरामुळे खानापूर तालुक्यातील 40 गावांचा संपर्क तुटला आहे. पूल पार करताना खानापुरातून  मलप्रभेत एक आणि अथणी तालुक्यातील जनवाडमधून कृष्णा नदीत एक अशा दोन वृद्धा  वाहून गेल्या आहे. वाढलेल्या पावसाने नदीकाठासह सार्‍यांच्याच हृदयाची धडझड वाढवली आहे, तर बेळगाव शहरासह अनेक भागात घरांची पडझड झाली आहे.

दरम्यान, ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांनी चिकोडीच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करून घरे पडलेल्यांना तातडीने मदत देण्याची ग्वाही दिली. पावसात कौलारू घरांची पडझड सुरू असून धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना पुन्हा दक्षतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. धरणातील पाणी पातळीत वाढ झाल्याने राकसकोपमधून दोन दरवाजे उघडून पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. 

विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर येण्यापूर्वी पुन्हा पावसाने जोर धरल्याने सार्‍यांचे अवसान गळले आहे. पुन्हा शिवारात पाणी फुगून महापूर येतो का, अशी भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकाच्या

मदतीने पूरग्रस्त भागात अतिदक्षतेचा इशारा दिला जात आहे. नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित होण्याची सूचना दिली जात आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरु झाला असून नदी, नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 

संततधार पावसामुळे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता शहापूर नार्वेकर गल्लीतील रहिवाशी प्रकाश डोंगरु माळवी यांच्या मालकीच्या कौलारु घराची भिंत कोसळून दीड लाखाचे नुकसान झाले. रयत गल्लीतील शाहीर यल्लाप्पा बिरजे यांच्या घराची भिंत कोसळून 50 हजाराचे नुकसान झाले. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता ही घटना घडली. सुदैवाने ही भिंत गणेशभक्तांवर कोसळली नाही.त्यामुळे अपघात टळला. यंदाच्या पावसात कौलारु घराच्या भिंती ढासळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाले आहे. जुनी वापरात नसलेली कौलारु घरे जमीनदोस्त झाली आहेत.