Sat, Sep 26, 2020 22:23होमपेज › Belgaon › युवकांना आता नेतृत्वाची आस

युवकांना आता नेतृत्वाची आस

Last Updated: Nov 02 2019 11:18PM
बेळगाव : जितेंद्र शिंदे

काही वर्षांपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे म्हातार्‍यांची संघटना, असे चित्र बिंबवण्यात येत होते. पण, गेल्या चार वर्षांपासून हे चित्र बदलले आहे. युवा वर्गाने समितीची अनेक आंदोलने व्यापून टाकली आहेत. काळ्यादिनाच्या निषेध फेरीतही हेच चित्र दिसून आले आहे.  त्यामुळे युवा वर्गाला नेतृत्वाची आस दिसून येत आहे. त्यामुळे लढ्याचा काही भार आता युवकांवर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

संघटनेत काम करत असताना आपले वेगळेपण सिद्ध करण्याची ज्याची क्षमता असते, त्याच्याकडेच नेतृत्व दिले जाते. थोड्या?अधिक प्रमाणात समितीतही असेच दिसून आले आहे. पण, संघटनेत कायम जिवंतपणा आणण्यासाठी तशा प्रकारचे कार्यक्रम घ्यावे लागतात. कार्यकर्त्यांना उपक्रम द्यावे लागतात. सीमालढा सध्या रस्त्यावर आणि न्यायालयात अशा दोन पातळ्यांवर सुरू आहे. त्यामुळे नेत्यांची ओढाताण होणे ही साहजिक बाब आहे. पण, त्यावर आता विचार होणे गरजेचे बनले आहे.

समिती सोडून राष्ट्रीय पक्षांच्या विसाव्यास गेलेल्या कोणत्याही मराठी माणसाला काही दिवसांनंतर उपरती होते. मातृभाषा आणि मुलभूत हक्कांवर गदा आली की, स्वाभिमानाला ठेच लागते. असे अनुभव अनेकांना आले आहेत. त्यातूनच आजचा युवा वर्ग पुन्हा मातृभाषेसाठी काम करण्यास सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

काळ्या दिनाच्या फेरीबाबत युवा वर्गाने सोशल मीडियावर महिनाभरापूर्वीपासूनच जागृती करण्यास सुरवात केली होती. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम बनत असल्यामुळे त्याचा वापर कसा करायचा, याचे कसब आजच्या युवा वर्गाला आहे. जागृतीच्या माध्यमातून आणि लढ्यातील  बारकावे हेरून युवा वर्ग  पुन्हा समितीच्या लढ्यात येत आहे. अशा वेळी नेत्यांनी कचखाऊ भूमिका घेतली तर, ती लढ्याला बाधक ठरेल.

रस्त्यावर उतरलेल्या युवकाला दिशा देण्याचे काम नेत्यांचे असते. समितीच्या लढ्यात आता युवा वर्ग अग्रभागी दिसून येत आहे. त्यामुळे या युवकांना दिशा देण्याबरोबरच त्यांच्याकडे काही प्रमाणात नेतृत्व देण्याची  जबाबदारीही  समिती नेत्यांची आहे.

हे. पदांच्या भांडणातच सीमाभागातील सत्ताकेंद्रांवरून मराठीची पीछेहाट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मराठीची पुन्हा भरभराट होण्यासाठी युवा वर्गाकडे झेंडा द्यावाच लागणार आहे. लवकरच महापालिकेपासून ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका लागणार आहेत. या काळात युवा वर्गामध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे काम करणे मराठीसाठी लाभदायक ठरणार आहे.

एक फळी उभी राहतेय...

मराठी भाषा, संस्कृतीबरोबरच सामाजिक कार्यासाठी युवा वर्गाचे योगदान महत्वाचे ठरते. त्यामुळे या रस्त्यावरच्या लढाईत पुढाकार घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची युवकांची एक फळी उभी राहात आहेत. मोर्चे, आंदोलने यासह विविध सामाजिक कार्यातही समितीच्या नावाने लढा देणारे युवक एकवटत आहेत, ही समाधानकारक बाब आहे.

 "