Tue, Sep 22, 2020 00:43होमपेज › Belgaon › तेलगू कॉलनीत मरीमाता-दुर्गामाताचे भव्यदिव्य मंदिर

तेलगू कॉलनीत मरीमाता-दुर्गामाताचे भव्यदिव्य मंदिर

Published On: Oct 08 2019 1:29AM | Last Updated: Oct 07 2019 8:42PM
बेळगाव : ज्ञानेश्वर पाटील

तेलगू कॉलनी, कॅम्प येथील भव्यदिव्य असलेल्या मरीमाता व दुर्गामाता मंदिरात नवरात्रीत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दसर्‍यादिवशी रथ मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते. बेळगाव येथे 80 वर्षापूर्वी स्थायिक झालेल्या तेलगू बांधवांनी या मंदिराची उभारणी केली असून गाभार्‍यात असलेल्या दुर्गा व मरी या दोघी बहिणींचे एकाच ठिकाणी दर्शन घेता येते.

या मंदिराचा  1961 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर दसरोत्सव सुरू करण्यात आला. मंदिर पूर्वाभिमुख आहे. दुर्गामातेची मूर्ती सिंहावर तर मरीमातेची मूर्ती वाघावर विराजमान आहे.24 ऑगस्ट 2019 मध्ये  चांदीची प्रभावळ बसविण्यात आली आहे. मूर्तीसमोर छोटेसे मुखवटे ठेवण्यात आले आहेत. गाभार्‍यातील मूर्ती रथ मिरवणुकीसाठी बाहेर काढल्यानंतर या मुखवट्यांची पूजा होते.  

बळ्ळारी जिल्हा पूर्वी आंध्रप्रदेशात होता. येथील अनेक कुटुंबांचा पादत्राणांचा व्यवसाय होता. व्यवसायाच्या शोधार्थ ही कुटुंबे 80 वर्षापूर्वी बेळगावात स्थायिक झाली. येथे आल्यानंतर या समाजाने कुलदैवत असलेल्या दुर्गामाता व मरीमातेचे छोटेसे मंदिर उभारले. काही वर्षानंतर 1961 मध्ये भव्यदिव्य मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिराचा कळस खूप उंच असून नजर खिळवून ठेवणारा आहे.  मंदिरात प्रशस्त सभामंडप असून दुसर्‍या मजल्यावरही सभागृह आहे. सभामंडपात दहा फूट लांबी रूंदीचे दोन दरवाजे लक्ष वेधून घेतात.  मंदिरात 1961 पासून श्री सार्वजनिक दसरा महोत्सव समितीतर्फे दसरोत्सव साजरा करण्यात येतो. 

नवरात्रीत या मंदिरात घटस्थापना केली जाते. रोज सकाळी व रात्री आरती, पूजा व प्रसाद होतो. अष्टमीला घटांची मिरवणूक काढण्यात येते. विजयादशमी रोजी पहाटे चार वाजता दोन्ही मूर्तींची रथात प्रतिष्ठापना करण्यात येते. यानंतर देवींची मिरवणूक ज्योती महाविद्यालयाच्या मैदानावर पोहोचते.  यावेळी सीमोल्लंघन झाल्यानंतर मूर्ती पुन्हा मिरवणुकीने मंदिराकडे आणण्यात येतात. दुसर्‍या दिवशी महाप्रसाद होतो.

दसरा महोत्सव समितीच्या कार्यकारिणीत  अध्यक्ष म्हणून मारूती जुवेकर असून प्रमोद पाटील, विलास पाटील, दुर्गादास कामटे, गोविंद कामटे, रवी भंडारी, जयवंत भोगे, गणेश गाणगेकर, राजू भोगे, श्रीनिवास पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते  आहेत.