Fri, Sep 25, 2020 12:38होमपेज › Belgaon › ग्रामीणमध्ये एकी, दक्षिणमध्ये प्रयत्न

ग्रामीणमध्ये एकी, दक्षिणमध्ये प्रयत्न

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 12:33AMबेळगाव ः प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक म. ए. समितीचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नाना यश येत आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील तीन मराठी उमेदवारांनी माघार घेतली आहे. दक्षिणमध्ये मात्र अद्यापही एकीचे प्रयत्न सुरू आहेत.

अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी ग्रामीण मतदारसंघातील मनोज पावशे, सुनील अष्टेकर, लक्ष्मण होनगेकर या तिघांनीही माघार घेतली. मात्र, मोहन बेळगुंदकर यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. अपक्ष उमेदवार मोहन मोरे यांचाही अर्ज कायम आहे.

दक्षिणमध्ये प्रकाश मरगाळे व किरण सायनाक यांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. उत्तर मतदारसंघातही आ. संभाजी पाटील व बाळासाहेब काकतकर यांचे अर्ज आहेत.

मराठी भाषिकांच्या हितासाठी सुरेश हुंदरे स्मृतिमंच व मराठी पाईक या कार्यकर्त्याकडून पंधरा दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे एकीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

मागील दोन विधानसभा निवडणुकीत बेकीमुळे म. ए. समितीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यंदा बेकी रोखण्यासाठी सुरु झालेल्या प्रयत्नांना ग्रामीण मतदारसंघात यश मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीणमध्ये आता समिती, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होईल. 

दक्षिण, उत्तरमध्ये दोन-दोन

दक्षिण व उत्तर मतदारसंघांमध्ये मात्र प्रत्येकी दोन मराठी उमेदवार आहेत. दोन्ही मतदारसंघांत उमेदवारांमध्ये एकमत घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असून शनिवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. 
दक्षिणमध्ये मध्यवर्तीचे अधिकृत उमेदवार प्रकाश मरगाळे आणि किरण गटाचे उमेदवार किरण सायनाक तर उत्तरमध्ये आ. संभाजी पाटील आणि बाळासाहेब काकतकर यांचे अर्ज आहेत.