Wed, Jan 27, 2021 08:12होमपेज › Belgaon › कागवाड, अथणीत उमेदवारांची अग्‍निपरीक्षा

कागवाड, अथणीत उमेदवारांची अग्‍निपरीक्षा

Published On: Jan 30 2018 11:14PM | Last Updated: Jan 30 2018 10:51PMकागवाड : प्रतिनिधी 

कागवाड आणि अथणी मतदारसंघात पक्षसंघटना मजबूत करण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. या वेळची निवडणूक उमेदवारांची अग्निपरीक्षा ठरणार आहे. कागवाड मतदारसंघात राजकीय बदल घडविण्याची प्रक्रिया चालू आहे. मे महिन्यापर्यंत राजकारणात कोणते आणि किती बदल होतात हे सांगता येत नाही. निजद नेते श्रीमंत पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कागवाड मतदारसंघात वेगळेच राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या निवडणुकीत निजदला दुसर्‍या क्रमांकाचे स्थान तर काँग्रेस तिसर्‍या स्थानावर होता. भाजपने मैदान जिंकले होते.

निजद उमेदवार श्रीमंत पाटील असल्याने निजद दुसर्‍या स्थानावर होता. पण निजदने यावेळी विजय मिळणार, अशी अपेक्षा धरली असून काही नेते निजदमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांना यश मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.

श्रीमंत पाटील यांचा काँग्रेस प्रवेश

निजदला रामराम करून श्रीमंत पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. श्रीमंत पाटील अभिमानी संघ व काँग्रेस पक्षाची मते मिळून श्रीमंत पाटील यांना चांगला फायदा होण्याची जोरदार चर्चा आहे. आगामी निवडणुकीत श्रीमंत पाटील यांनाच तिकीट मिळणार असे, मानलेे जाते. श्रीमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेस 20 वर्षांनी परत गुलाल लावून घेणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांतून होत आहे.
कागवाडमध्ये आ. राजू कागे 

पुन्हा बाजी मारणार ?

भाजपचे उमेदवार आ. राजू कागे यांनी चार वेळा बाजी मारली आहे. या वेळच्या निवडणुकीतही आपणच विजय होऊ, असा विश्‍वास व्यक्त करीत आहेत. 

अथणी मतदारसंघातील आ. लक्ष्मण सवदी यांना शह देण्यासाठी काँग्रेस जोरदार तयारीला लागला आहे. लिंगायत धर्माचे मोटगी मठाचे प्रभू चन्नबसव स्वामी यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याचे घाटत आहे.

सत्तेसाठी पक्षबदलाची धांदल

सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्ष कोणत्या थरावर जातील आणि पक्षात केव्हा आणि कसे बदल होतील, हे सांगता येत नाही. अशा बदलाने पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये बदल होत आहेत. यामुळे यावर्षीच्या विधानसभा निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.

मेमध्ये होणार्‍या निवडणुकीत उमेदवाराचे व्यक्‍तिमत्त्व, पक्ष, जात आणि पैसा यावर अवलंबून राहणार आहेत. या वेळेच्या निवडणुका उमेदवारांची अग्निपरीक्षा ठरणार हे निश्‍चित ! कागवाड मतदारदसंघात राजकीय वातावरण बदलत चालले आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आतापासूनच काम करीत आहेत.