कारदगा : वार्ताहर
येथील साहित्य विकास मंडळातर्फे 24 नोव्हेंबर रोजी 24 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होत आहे. एकूण पाच सत्रात साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशिद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दत्त साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रेणिक पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रसंगसागर महाराज यांच्या उपस्थितीत अॅड. सी. बी. कोरे-रेंदाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, उद्योजक एस. एम. माळी यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन, एन. के. प्रताप-निपाणी यांच्या हस्ते व्यासपीठ उद्घाटन होणार आहे. ग्रामपंचायत अध्यक्षा नंदिनी हेगडे स्वागताध्यक्षा आहेत.
सकाळी 8 ते 10 यावेळेत ग्रंथदिंडी, 10.30 वा. उद्घाटन होणार असून यावेळी मंत्री शशिकला जोल्ले, खा. आण्णासाहेब जोल्ले, माजी खा. प्रकाश हुक्केरी, आ. गणेश हुक्केरी, आ. प्रकाश आवाडे, माजी आ. काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, प्रा. सुभाष जोशी, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, अरिहंतचे संस्थापक रावसाहेब पाटील, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, सुनीलकुमार लवटे, सतीश डाळ्या, लक्ष्मणराव चिंगळे, जि. पं. सदस्या सुमित्रा उगळे, आण्णासाहेब हावले, प्रदीप जाधव, एपीएमसी सदस्य नितेश खोत, ता. पं. सदस्य दादासो नरगट्टे, डॉ. अभिनंदन मुराबट्टे, अरविंद खराडे, रामभाऊ पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
12 ते 1 यावेळेत अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसर्या सत्रात 1 ते 2.30 या वेळेत जगण्याचा मूलमंत्र या विषयावर प्रा. आण्णासाहेब भागाजे (धामोड), व पर्यावरणाच्या अवकाशातील आम्ही या विषयावर दत्ता लवटे-कोल्हापूर यांचे व्याख्यान, तिसर्या सत्रात 2.30 ते 4 यावेळेत महापूर या विषयावर आप्पासाहेब खोत (ज्येष्ठ साहित्यिक, जाखले) यांचे कथाकथन, चौथ्या सत्रात दुपारी 4 ते 6 यावेळेत कवी प्रशांत मोरे (मुंबई), अंकुश आरेकर (पुणे), उमेश सुतार (चिंचवाड) या कवींचे कविसंमेलन होणार आहे. पाचव्या सत्रात सायंकाळी 6 ते 8 यावेळेत वसंत हंकारे-सांगली यांचे विनोदातून प्रबोधन हा कार्यक्रम होणार आहे. शिवाय साहित्य विकास मंडळ व पतंजली योग समिती-कोल्हापूर यांच्यातर्फे 14 ते 20 नोव्हेंबरअखेर रोज सकाळी 5 ते 6.30 यावेळेत जैन समुदाय भवन येथे मोफत योग प्राणायाम शिबिर होणार आहे.
17 रोजी सकाळी नाडगे कॉलेज सभागृहात डॉ. अभिनंदन मुराबट्टे व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने मोफत हृदयरोग व मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे.उपाध्यक्षा सुनीता कोगले यांनी स्वागत केले. बाळासाहेब नाडगे, महादेव दिंडे, कल्पना रायजाधव, कुमार हेगडे, गजानन पाटील, रावसाहेब सावंत, कुमार संकपाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सुचित बुडके, सुभाष ठकाणे, भाऊसो चिंदके, सदाशिव खोत, संभाजी अलंकार, शिवाजी माने, तुकाराम गुणके आदी उपस्थित होते.