Sat, Jul 11, 2020 09:13होमपेज › Belgaon › कर्नाटकात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत

कर्नाटकात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत

Last Updated: Jul 02 2020 7:55AM
बेळगाव, बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. 

महसूल मंत्री आर. अशोक यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर लॉकडाऊन अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. याद्वारे त्यांनी राज्यात लॉकडाऊनची शक्यता वर्तवली. 

सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. लॉकडाऊन केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना त्रास होणार आहे. त्यामुळे 4 जुलैनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार आहे. लॉकडाऊन, हाफ लॉकडाऊनबाबत सल्‍ला दिला गेला आहे. याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना असल्याची माहिती आर. अशोक यांनी दिली.

अशोक म्हणाले, लॉकडाऊन गरजेचे आहे. त्याबरोबरच उत्पन्नही तितकेच आवश्यक आहे. कोरोनासोबतच आता जीवन जगावयाचे आहे. पण, खबरदारीही तितकीच महत्त्वाची आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत. हा लढा किती दिवस सुरू राहणार, याची माहिती कुणालाच नाही. पण, एक दिवस यावर मात करणार असल्याच विश्‍वास आहे. 

कोरोना वॉरियर्स म्हणून सेवा बजावणारे खासगी डॉक्टर, निमवैद्यकीय कमंचार्‍यांचा 50 लाखांचा विमा उतरवण्यात येणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहे. खासगी रुग्णालय प्रमुखांशी मंगळवारी बैठक घेतल्यानंतर याबाबतची माहिती पत्रकारांना  देण्यात आली.

आठला बंदसाठी पोलिसांची धावपळ 

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाने  रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू जाहीर केल्यानंतर पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. रात्री आठ वाजता सर्व बंद करायचे आहे, अशी सूचना सायंकाळी 6.30 ते 7 वाजताच देत पोलिस वाहने शहर व मुख्य रस्त्यावरून फिरत आहेत. सोमवारी तसेच मंगळवारी रात्रीही 8 वा. दुकाने बंद होती. परंतु, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मात्र नेहमीसारखीच दिसून येत होती. 

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार रात्री 8 ते पहाटे पाच या काळात कर्फ्यू व प्रत्येक रविवारी पूर्ण लॉकडाऊन होणार आहे. सहा वाजल्यापासूनच पोलिस चिता वाहनातून फिरून आठ वाजता दुकाने बंद करण्याची सूचना करत होते. मंगळवारी देखील पोलिसांकडून दुकाने बंद करण्यासाठी सूचना केल्या जात होत्या. त्या-त्या ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांनी आपल्या सहकार्‍यांना विभाग वाटून दिला असून, तेथे जाऊन बंद करण्यास सांगण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आधी रात्री 10 वाजेपर्यंत रस्त्यावर असणारी गर्दी आता 8 वा. पांगत असल्याचे चित्र आहे. 

रस्त्यावर वाहनधारकांना सूचना

दुकाने जरी बंद होत असली, तरी बाहेर फिरणारे मात्र आठच्या आत घरात जात नसल्याचे दिसून येत आहे. व्यापारी, नोकरदार किंवा अन्य कामांसाठी बाहेर पडणारे वाहनधारक रात्री नऊ नंतरही रस्त्यावर दिसत आहेत. पोलिस त्यांना सध्या तरी समजावून सांगत आहेत.