Sat, Feb 29, 2020 11:31होमपेज › Belgaon › भाजप बालेकिल्ल्यात काँग्रेसची .डरकाळी

भाजप बालेकिल्ल्यात काँग्रेसची डरकाळी

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 11 2018 11:49PMबेळगाव  : प्रतिनिधी

एकेकाळी काँग्रेेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कागवाड मतदारसंघात भाजपने गेल्या पंधरा वर्षांपासून वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र, यावेळी काँग्रेसकडून जोरदार आव्हान देण्यात येत आहे. ‘निजद’मधून काँग्रेसमध्ये गेलेल्या श्रीमंत पाटील यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.आ. राजू ऊर्फ भरमगौडा कागे यांनी गत तीन विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे निवडणूक लढविताना विजय मिळविला आहे. विजयाची हॅट्रीक त्यांनी साधली असून ते चौथ्यांदा रिंगणात उतरणार आहेत. भाजपने कागे यांना पुन्हा एकदा उमेदवारी घोषित केली आहे. 

2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, निजद आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली. निजद, काँग्रेस व अन्य पक्षांत मतांची विभागणी झाल्यामुळे आ. राजू कागे यांचा विजय झाला.
या निवडणुकीत अनेक संदर्भ बदलले आहेत. राजकीय घडामोडी घडल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत निजदच्या माध्यमातून कागे यांच्या समोर जोरदार आव्हान निर्माण केलेल्या श्रीमंत पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून श्रीमंत पाटील, दिग्विजय पवार यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र, श्रीमंत पाटलांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. दोन दिवसांत उमेदवारीची घोषणा होईल.

श्रीमंत पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. यासाठी साखर कारखान्याचा प्रभावी वापर त्यांनी केला असून अनेक पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. यामुळे एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पट्ट्यात पाण्याची सोय झाली आहे. त्या जोरावर त्यांच्याकडून विजयावर दावेदारी केली जात आहे.
या मतदारसंघात काँग्रेसने 6 वेळा विजय मिळविला आहे. त्याचबरोबर भाजप 3, जनता पक्ष 2, जनता दल 1 व संयुक्‍त जनता दलाने एकदा विजय मिळविला आहे. एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ भाजपने हिसकावून घेतला आहे. 

गेल्या पंधरा वर्षांपासून आ. राजू कागे यांनी याठिकाणी आपले वर्चस्व ठेवले आहे. यातून काही भागात त्यांच्याविषयी नाराजी निर्माण झाली आहे. त्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आ. कागे यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. ‘निजद’कडून उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक लढतीत कोण बाजी मारेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags :bjp's, stronghold ,congree's, roar ,belgaon news