Sat, Feb 29, 2020 19:35होमपेज › Belgaon › अथणी तालुक्यात पावसाचा दणका

अथणी तालुक्यात पावसाचा दणका

Last Updated: Oct 25 2019 9:02PM
संबरगी ः प्रतिनिधी

अथणी तालुक्यात गेले आठ दिवस झाले परतीच्या पावसाचा दणका सुरू असून पावसाचा जोर कायम आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर पावसाने कृष्णा काठ व दुष्काळभागात पिकाची दाणादाण उडवली असून कोकटनूर यल्लम्मा देवीचे मंदिराकडे पाणी आले आहे.

पावसाने कहर केल्याने ग्रामीण भागातील संपर्क रस्ते बंद झाले आहेत. तिसर्‍यांदा कृष्णा नदीस पूर येण्याचा धोका असून तालुका प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागात विशेष करून अथणी उत्तर भागात पावसाने जुनी घरे पडली आहेत. पावसाने अथणी उत्तर भागातील कृष्णा नदी भरून वाहत आहे. अथणी शहरात अनेक ठिकाणी पाणी तुडूंब भरले असून गटारी भरून वाहत आहेत. स्वच्छता करण्याचे काम नगरपालिका कर्मचार्‍यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोकटनूर येथील यल्लम्मा देवीचे मंदिरात पाणी आले आहे. विशेष करून खिळेगाव, पांडेगाव, संबरगी, शिरूर, तावशी, जंबगी, नागनूर, अनंतपूर, गुंडेवाडी, बाळीगेळी, किरणगी, बेवनूर परिसरात पावसाने थैमान घातले आहे. अथणी शहरात दिवसभर पाऊस तर ग्रामीण भागात रात्रभर पाऊस होत असल्याने सर्वांची तारांबळ उडाली आहे. 

 

पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झालाा आहे. पावसाने खरिपाबरोबर रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी पेरणी 70 टक्के पूर्ण झाली होती. पावसाने बियाणे उगवली नाहीत. त्यामुळे परत शेतकरी संकटात सापडला असून पावसाने लाखोचे नुकसान झाले आहे. अथणी उत्तर भागात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बसगौडा पाटील यांनी केली आहे.