Sat, Jul 11, 2020 09:10होमपेज › Belgaon › ‘सारी’चा पहिला बळी

‘सारी’चा पहिला बळी

Last Updated: Jul 02 2020 7:55AM
बेळगाव, बंगळूर : पुढारी वृत्तसेवा 

दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने बेळगाव जिल्ह्यात पहिला बळी घेतल्यानंतर आता ‘सारी’ या विकाराने पहिला बळी घेतला आहे. अथणी तालुक्यातील संकोनट्टी येथील 32 वर्षीय तरुणाचा श्‍वसनाच्या तीव्र त्रासामुळे मृत्यू झाला आहे. तो जानेवारी महिन्यात इंग्लंडहून परतला होता. 27 जून रोजी श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामध्ये यळेबैल गावच्या विवाहितेचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच तिची जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली आहे. त्याबरोबरच राज्यातही मंगळवारी कोरोनाने उच्चांकी 20 जणांचा मृत्यू झाला. तर, 957 रुग्णही वाढले आहेत.

सारी विकाराला बळी पडलेला तरुण जानेवारी महिन्यात इंग्लंडहून पत्नीसह परत आला होता. तो इंग्लंडमध्ये खासगी कंपनीत कामाला होता. गतवर्षीच त्याचे लग्न झाले. त्याची पत्नी तीन महिन्यांची गरोदर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला श्‍वसनाचा त्रास होता. वारंवार तापही येत होता. त्यामुळे 27 जून रोजी तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच सोमवारी (दि. 29) रात्री त्याचा मृत्यू झाला. सरकारी मार्गसूचीनुसार त्याच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

एप्रिल महिन्यात हिरेबागेवाडी येथील 80 वर्षीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोणताही बळी गेला नव्हता. पण, सोमवारी युवकाचा बळी गेल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य खात्याकडूनही चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे.

कर्नाटकात 20 मृत्यू 

कर्नाटकात सलग तिसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले. मंगळवारी 947 कोरोना रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या 15,242 झाली आहे. रुग्णांच्या मानाने मृत्यू संख्याही वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत 20 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 246 जण कोरोनाबळी ठरले आहेत. दिवसभरात 235 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आतापर्यंत 7,918 जण कोरोनामुक्‍त झाले आहेत.

बंगळूर शहर जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी पाचशेपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले. या जिल्ह्यात दिवसभरात  503, बळ्ळारी 61, हावेरी 49, मंगळूर 44, कारवार 40, विजापूर 39, शिमोगा 22, बंगळूर ग्रामीण 21, बिदर 17, धारवाड 17, हासन 16, गुलबर्गा 15, रायचूर 15, चिक्‍कबळ्ळापूर 13, रामनगर 12, चिक्‍कमगळूर 10, उडपी 9, म्हैसूर 9, बागलकोट 4, कोडगू 4, कोलार 3, चित्रदुर्ग 3, यादगिरी 2, मंड्या 2, बेळगाव 2, गदग 2, तुमकूर 1 अशी रुग्णांची आकडेवारी आहे.

चोवीस तासांत बळ्ळारीत पाचजणांचा मृत्यू झाला. पैकी चौघांचे वय 50 वर्षांवर आहे. बंगळूरात चौघांचा मृत्यू झाला.  हावेरी, विजापूर, धारवाड, बेळगाव, दावणगिरी, म्हैसूर  येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. 

वीस जण क्‍वारंटाईन

मृत तरुणाच्या प्राथमिक आणि दुय्यम संपर्कात आलेल्या 20 जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या घशातील द्राव प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. 8 प्राथमिक संपर्क आणि 12 जण दुय्यम संपर्कात होते, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली.