Wed, Sep 23, 2020 20:41होमपेज › Belgaon › गव्यांच्या उच्छादामुळे शेतकरी बनले त्रस्त

गव्यांच्या उच्छादामुळे शेतकरी बनले त्रस्त

Published On: Sep 26 2019 2:21AM | Last Updated: Sep 25 2019 8:55PM
किणये : वार्ताहर 

महिनाभरापासून कर्ले शिवारात गव्यांच्या कळपाने ठाण मांडले आहे.  परिसरातील बटाटे, बीन्स, रताळी, भात, मक्‍का, जोंधळा पिकांचे नुकसान करत आहेत. वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत असून कर्ले शिवारात दिवसा व रात्री गव्यांनी दहशत निर्माण केली आहे.दिवसभर शेतात राबणे तर रात्री शेतात राखण करण्याची कसरत शेतकर्‍यांना करावी लागत आहे. 

परिसरातील कर्ले, किणये, बहाद्दरवाडी, जानेवाडी, नावगे, बेळवट्टी, कावळेवाडी गावातील शेतजमीन डोंगराळ भागात आहे. पावसाळ्यात याठिकाणी भात, रताळी, भुईमूग, नाचणा पिके घेतली जातात. रताळी, भुईमूग प्रमुख्याने डोंगराळ भागात घेतली जातात.  त्यांना गव्यांचा फटका बसत आहे.

 सध्या बीन्स, मक्‍का पिके बहरली आहेत. याकाळात वनप्राण्यांच्या समस्येने डोके वर काढले आहे. जंगली प्राण्यापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी परिसरातील शेतकरी रात्री राखण करतात. डुक्‍कर, गव्यांकडून दिवसाढवळ्या पिकांची नासाडी करण्यात येत आहे. यामुळे या परिसरातील शेती कामे करण्यासाठी  केलेल्या शेतकरी व महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.

 वन्यप्राण्यांच्या उच्छादाविरोधात वन खात्याच्या अधिकार्‍याकडून  ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत. कर्ले येथील शेतकरी वन्यप्राण्याकडून  होणारे नुकसान टाळण्यासाठी रात्री राखण करण्यासाठी शेतात जात आहेत. दिवसभर शेतात राबायचे आणि रात्रभर पिकांचे रक्षण करायचे, अशी कसरत करावी लागत आहे. 

एक नजर
 - वन्यप्राण्यांकडून दरवर्षी शेतीचे नुकसान. 
 - वनअधिकार्‍यांकडून केवळ आश्‍वासन.
 - भरपाईची रक्‍कम तुटपुंजी.
 - लहरी निसर्ग आणि वन्यप्राण्यांचा उच्छाद यामुळे शेतकरी त्रस्त.

 उन्हाळा असो किंवा पावसाळा गव्यांकडून शेतीचे  नुकसान करण्यात येते. डोंगराजवळ शेती असून याचा फटका बसतो. वन्यप्राण्यांकडून खूप नुकसान होते. वनाधिकार्‍यांनी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. 
- शंकर गोवेकर, शेतकरी