Tue, May 26, 2020 15:32होमपेज › Belgaon › ...तर बस गेली असती दरीत 

...तर बस गेली असती दरीत 

Last Updated: Feb 19 2020 11:29PM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरहून पणजीला निघालेल्या भरधाव बसवरील चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले. बस वळण घेण्याऐवजी थेट घाटाकडे पुढे गेली. परंतु, समोरील कठडा व मातीच्या ढिगार्‍यामुळे थांबली. अन्यथा सदर बस 400 फूट खोल दरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता. बसममध्ये 40 प्रवासी होते. यापैकी 5 जण किरकोळ जखमी झाले. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे ही घटना घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी कोल्हापूरहून पणजीला बस (एमएच-14, बीटी-3572) निघाली होती. सकाळी अकराच्या सुमारास बस तिलारी घाटातील उतरतीला असलेल्या जयकर पॉईंट येथे आली. या ठिकाणी असलेल्या वळणावर चालकाला भरधाव बसवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे बस उजवीकडे वळण्याऐवजी थेट समोर घाट असलेल्या बाजूला गेली. 

केवळ दैव बलवत्तर

ज्या ठिकाणी बस घाटाच्या बाजूने गेली तेथे खडी व मातीचा ढिगारा आहे, शिवाय समोरील बाजूस कठडा देखील आहे. त्यामुळे बस याला धडकून थांबली. तरीही दरीच्या बाजूने 15 टक्के बस पुढे गेल्याचे दिसून येते. जर येथे माती व कठडा नसता तर बस थेट 400 फूट दरीत कोसळण्याचा धोका होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप राहिले. परंतु, बसला धक्‍का बसल्यामुळे पाचजण किरकोळ जखमी झाले असून, यामध्ये एका वृद्धेचा समावेश आहे. प्रवासी जेव्हा बसमधून खाली उतरले तेव्हा त्यांना धक्‍का बसला.

अपघाती वळण, पाच अपघात 

ज्या जयकर पॉईंटजवळ ही घटना घडली तेथे अपघाती वळण आहे. येथून जाताना सावकाश जावे लागते. परंतु, भरधाव असलेल्या वाहनाला येथे आतापर्यंत पाच गंभीर अपघात घडलेले आहेत. येथून जाताना बसचालक नेहमीच भरधाव असतात. त्यांनी वेगावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्‍त होत आहे.