Tue, Sep 22, 2020 01:44होमपेज › Belgaon › नाराज काँग्रेस आमदार गोव्याला?

नाराज काँग्रेस आमदार गोव्याला?

Published On: May 27 2019 1:32AM | Last Updated: May 27 2019 1:32AM
बंगळूर : प्रतिनिधी

भाजपमधील काही नेते ‘ऑपरेशन कमळ’ राबवून काँग्रेस-निजद आघाडी सरकार पाडण्याची तयारी करत आहेत. यासाठी काँग्रेसमधील काही नाराज आमदारांनी रिसॉर्ट राजकारणास प्रारंभ केला आहे. गोवा येथे काही आमदार गेल्याची चर्चा सुरू झाली असून तिकडे जाणार्‍या आमदारांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसचे नाराज आमदार रमेश जारकिहोळी यांनी रविवारी (दि. 26) भाजपचे ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांची बंगळूर येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यात सद्यस्थितीतील घडामोडींवर चर्चा झाली. कृष्णा यांनी काही टिप्स आ. रमेश यांना दिल्या. तेथून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी आ. रमेश यांना गराडा घातला. त्यावेळी त्यांनी कृष्णा यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले.

काँग्रेसचा त्याग करायचाच असेल, तर आपण एकट्याने करणार नाही, आपली टीम आहे. त्या टीमने एकमताने निर्णय घेतल्यास सर्वच आपापल्या आमदारकीचे राजीनामे देतील, असे आ. जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, जारकिहोळी यांनी पक्षातील नाराज आमदारांना गळ घालण्यास प्रारंभ केला आहे. महेश कुमठळ्ळी, श्रीमंत पाटील, बी. नागेंद्र, कंपली गणेश, बी. सी. पाटील यांच्यासह काहींशी त्यांनी पहिल्या फेरीतील चर्चा केली आहे. तेथून ते गोव्याला गेले आहेत. याआधी त्यांनी मुंबई गाठून तेथे राजकीय हालचाली केल्या होत्या; पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. 

आता पुन्हा एकदा सरकार पाडण्याची कसरत सुरू केली असून रिसॉर्ट राजकारणास प्रारंभ झाला आहे. गोवा येथील प्रभावी मंत्र्यावर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.