Sat, Feb 29, 2020 19:39होमपेज › Belgaon › खडक गल्ली परिसरात वाढीव बंदोबस्त

खडक गल्ली परिसरात वाढीव बंदोबस्त

Published On: Dec 03 2017 1:09AM | Last Updated: Dec 02 2017 11:36PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

संवेदनशील बनलेल्या खडक गल्ली परिसरात शनिवारी रात्री पुन्हा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तसेच वाहने तैनात करण्यात आली आहेत. 

शनिवारी ईद-ए-मिलादनिमित्त शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक सुरू असतानाच सायंकाळी भाजप नेते राजीव टोपण्णावर यांनी एक चित्रफीत जारी करून काही उर्दू नगरसेवक पाकिस्तानी राष्ट्रगीतावर नृत्य करत असल्याचा आरोप केला.

मात्र, काहीच वेळात पोलिस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी ती चित्रफीत जुनी असल्याचे स्पष्ट केले. तरीही चित्रफितीवरून शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे संवेदनशील परिस्थिती हाताळण्यासाठी खडक गल्ली, भडकल गल्ली, कोतवाल गल्ली, घी गल्ली, चांदू गल्ली, चव्हाट गल्ली परिसरात रात्री 7 च्या सुमारास अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. 

टिपू सुलतान जयंतीपासून हा परिसर संवेदनशील आहेत. 5 नोव्हेंबरपासून तीन वेळा दोन गटात वादावादीही झालेली आहे. त्यामुळे आधीपासूनच पोलिस बंदोबस्त आहे. त्यात शनिवारी ईद आणि कथित चित्रफितीमुळे पोलिस उपायुक्तांनी परिसरातील बंदोबस्त वाढविला. सात गल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर पोलिस कर्मचारी तसेच बंदोबस्ताची वाहने तैनात करण्यात आली होती.