Thu, Sep 24, 2020 06:06होमपेज › Belgaon › स्वतंत्र उत्तर कर्नाटकासाठी आंदोलन

स्वतंत्र उत्तर कर्नाटकासाठी आंदोलन

Last Updated: Nov 02 2019 2:22AM
गुलबर्गा : प्रतिनिधी

सहा जिल्ह्यांसह स्वतंत्र राज्याची मागणी करून कल्याण कर्नाटक आंदोलन समितीने येथील सरदार वल्लभभाई पटेल चौकात निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी हातामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश असणारा स्वतंत्र कल्याण कर्नाटक राज्याचा ध्वज प्रदर्शित केला.

गेल्या अनेक वर्षांपासून गुलबर्ग्यासह यादगीर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी आणि रायचूर या उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्योत्सव दिनी शासनाच्या धोरणाचा विरोध करून घोषणाबाजी करण्यात आली.

उत्तर कर्नाटक आंदोलन समितीचे अध्यक्ष एम. एस. पाटील नरिबोळ म्हणाले, म्हैसूर भागाचा विकास करण्याकडे शासनाने पूर्ण लक्ष दिले; पण हैदराबाद- कर्नाटकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून विकासाची, विशेष अनुदानाची मागणी केली जात आहे. मात्र, आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी केली आहे. यामध्ये सहा जिल्हे समाविष्ट करावीत. पिढ्यान्पिढ्या लोक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. औद्योगिक, शैक्षणिक विकासाच्या द़ृष्टीने मागासलेल्या जिल्ह्यांचे वेगळे राज्य केल्यास जनतेला सुसह्य होणार आहे.

समितीचे सदस्य विनोद पाटील यांनी 1 नोव्हेंबर रोजी राज्योत्सव साजरा केला जात असला तरी उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने शासनाविरोधात आंदोलन छेडले जात असल्याचे सांगितले. आणखी किती वर्षे आंदोलन करावे लागेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. समितीच्या कार्यकर्त्यांनी चौकामध्ये निदर्शने केली. त्यानंतर ठिय्या आंदोलन केले. ध्वज फडकवल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक व सुटका केली.

 "