Sat, Feb 29, 2020 12:54होमपेज › Belgaon › पराभूतांनाही मिळणार मंत्रिमंडळात स्थान

पराभूतांनाही मिळणार मंत्रिमंडळात स्थान

Last Updated: Dec 28 2019 1:23AM
बंगळूर ः प्रतिनिधी

राज्यात भाजप सत्तेवर येण्यासाठी स्वत:वर अपात्रता ओढवून घेतलेले आणि पोटनिवडणुकीत पराभूत झालेले एच. विश्वनाथ, एमटीबी नागराज यांच्यासह सर्वांना मंत्रिपद निश्चित झाले आहे. याविषयी मुख्यमंत्री येडियुराप्पांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्टपणे कळवले आहे.

काँग्रेस आणि निजदमधून बाहेर पडलेले आणि पोटनिवडणुकीत जिंकलेल्या आमदारांनाच मंत्रिपद देण्याचे ठरवण्यात आले होते. पण, भाजप सत्तेवर येण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांना मंत्रिपद देण्याचा निर्णय मुख्यमंत्री येडियुराप्पांनी घेतला आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील सहाजणांना पदावरून हटवून त्यांचा पक्ष संघटनेसाठी वापर केला जाणार आहे. शिवाय पक्षासाठी काम करत असणार्‍या प्रमुखांनाही मंत्रिपद देण्याचा हिशेब मुख्यमंत्र्यांनी घातला आहे.

धर्मादाय खात्याचे मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांना मंत्रिपदावरून हटवून विधान परिषद अध्यक्षपदी कायम ठेवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निजदमधील काही विधान परिषद सदस्यांनी पुजारी यांना सभागृहाचे अध्यक्षपद दिल्यास पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, जगदीश शेट्टर यांना राज्यपालपद देण्यात येणार आहे. तशी ऑफर त्यांना देण्यात आली असून त्यांच्या रुपाने आणखी एक मंत्रिपद रिक्त होणार आहे.

गृहमंत्री बसवराज बोम्माई यांचे नावही मंत्रिपदावरुन डच्चू देणार्‍यांमध्ये आहे. याबाबतचे संकेत मिळाल्यानंतर बोम्माई यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा केली. पण, येडियुराप्पांनी मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार्‍यांची यादी वरिष्ठांना सादर केली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचेही हात बांधले गेले आहेत.

अंगार, जे. एच. तिप्पारेड्डी, अरविंद लिंबावळी, उमेश कत्ती यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. त्यांना मंत्रिपद न दिल्यास भविष्यात समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. आपल्यावर विश्वास ठेवून पदाचा त्याग केलेल्यांचा विश्वासघात करणार नसल्याचे मुख्यमंत्री येडियुराप्पांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी संबंधितांना मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.