होमपेज › Belgaon › निसर्गाच्या सान्निध्यात बहरली चित्रजत्रा

निसर्गाच्या सान्निध्यात बहरली चित्रजत्रा

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 10:21PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील शेकडो कलाकारांनी एकत्र येऊन बेळगावात आपल्या चित्रकृतींची जत्रा भरविली. कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निसर्गरम्य बगीच्यात भरविण्यात आलेल्या चित्र जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील प्रतिभावंत चित्रकारांनी आपल्या कलाकृतींना जनतेसमोर मांडण्यासाठी चित्रजत्रा प्रदर्शनाचे आयोजन केले होते. रविवारी सकाळी जिल्हा पोलिस प्रमुख रविकांतेगौडा यांच्या उपस्थितीत चित्रजत्रेचे उद्घाटन झाले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष साजिद शेख उपस्थित होते.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उद्यानात मांडण्यात आलेल्या चित्रजत्रेत 100 हून अधिक चित्रकारांनी एकूण दीड हजाराच्या आसपास चित्रकृतींचे प्रदर्शन मांडले होते. एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या नजर खिळवून ठेवणार्‍या चित्रकृती पाहून रविकांतेगौडाही अवाक् झाले. अशाप्रकारच्या प्रदर्शनातून स्थानिक कलाकारांच्या चित्रकृतींना जवळून पाहण्याची नामी संधी मिळाली. अशाप्रकारच्या प्रदर्शनांचे वेळोवेळी आयोजन होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

चित्रजत्रेत 120 हून अधिक स्टॉल्सवर चित्रकारांच्या विविध कलाकृती आकर्षकरित्या मांडण्यात आल्या होत्या. निसर्ग चित्रे, पशुपक्ष्यांची चित्रे, मॉर्डन आर्ट त्याचप्रमाणे बॉलपेन आणि पेन्सिलमधून रेखाटण्यात आलेल्या चित्रांनी सार्‍यांच्या नजरा वेधून घेतल्या होत्या. बेळगावचे चित्रकार शिरीष देशपांडे यांनी बॉलपेनमधून रेखाटलेली पंडित रामभाऊ विजापूरे व कै. माजी राष्ट्रपती अब्दुलकलाम यांची रेखाचित्रे उपस्थितांना भावली. 

एक दिवसाच्या चित्रजत्रेला बेळगाव परिसरातील कलाप्रेमींनी उदंड प्रतिसाद दर्शविला. बेळगावकरांच्या उदंड प्रतिसादाबद्दल चित्रकारांनी समाधान व्यक्त केले. चित्रकारांसाठी अशाप्रकारच्या प्रदर्शनीय व्यासपीठाची नितांत गरज होती. चित्रजत्रेने विद्यार्थ्यापासून ज्येष्ठांपयर्ंत अनेक कलाकारांच्या चित्रांचा अनुभव मिळाला. चित्रजत्रेने आपल्या कलाकृती लोकांपर्यंत पोहोचल्या असा विश्‍वासही कलाकारांनी व्यक्त केला. आर्ट एफिअर्सचे विश्‍वनाथ गुगरी यांनी स्वागत केले.  अमृत चरंतीमठ यांनी आभार मानले. चित्रजत्रेतील काही कलाकृतींची विक्रीही झाली.