Wed, Sep 23, 2020 21:51होमपेज › Belgaon › चाँद शिरदवाडचा उरुस : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक

चाँद शिरदवाडचा उरुस : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 8:18PMकारदगा : प्रशांत कांबळे

चाँद शिरदवाड येथील ग्रामदैवत हजरत चाँदपीर यांचा उरुस 25 जानेवारीपासून सुरु होत आहे. त्यानिमित्त...

चाँद शिरदवाड हे गाव चिकोडी तालुक्यातील दूधगंगा नदी काठावर बसलेले गाव. सुमारे 10 ते 12 हजार लोखसंख्या वस्ती असलेल्या या गावाने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती साधली आहे. येथील चाँदपीर बाबांचा ऊरुस म्हणजे हिन्दू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानला जातो.

गावाबद्दल अख्यायिका आहे की,  महापुराच्या तडाख्याने शिरदवाड येथील लोक निपाणी-इचलकरंजी मार्गावर स्थायिक झाले. येथे चाँदपीर दर्गाह असल्याने गावास चाँद शिरदवाड म्हणून नाव पडले. त्या काळात एक गोसावी नदी किनारी तपश्‍चर्या करीत होता. यावेळी चाँदवली नावाचा मुसलमान सरदार आला. काही काळानंतर त्याचा मृत्यू झाला. नंतर देवस्थान चाँदवली दर्गा म्हणून ओळखू लागले. त्यांचा उल्लेख नाथपंथी पोथीग्रंथात असल्याचे सांगितले जाते. 

दर्गाह समोर असणारे गोमुख, रेखीव पध्दतीने कोरलेले हत्ती, चक्र, यती, बैल, नाग, पक्षी, कासव, नगरखाना, हिंदू सांस्कृतिक जीवनाची तर दर्ग्याला असलेले मनोरे, चाँद, समाधी व गलीफ हे मुस्लीम संस्कृतीचे ओळख करुन देतात. त्याचबरोबर दर्ग्याचा एक बाजूला दगडामध्ये कोरलेली हत्तीची मूर्ती दुसरी घोड्याची आहे. दर्गाहसमोर दर्शनी भागामध्ये पितळी कासव तर पश्‍चिम बाजूला नंदीचे मंदिर आहे. काही अंतरावर हनुमान मंदिर आहे. पूजा करणारे मुजावर व पाणी आणणारे पकाले यांना 10 एकर जमीन संस्थान मठाकडून देण्यात आली आहे. 

यामधून दर्ग्याची उरसात गंधरात्र व गलीफ चढविल्यावर प्रथम नैवेद्याचा मान जैन व लिंगायत पाटील यांना आहे. गलिफाचा मान संस्थान प्रमुखांना देण्यात आला आहे. गंधलेप करण्याचा मान पाटील घराण्याकडे आहे.