Wed, Sep 23, 2020 21:38होमपेज › Belgaon › कन्नड गाण्याचा वाद पेटला; सीमावासीय-पोलिसांत झटापट

कन्नड गाण्याचा वाद पेटला; सीमावासीय-पोलिसांत झटापट

Published On: Jan 23 2018 8:57PM | Last Updated: Jan 23 2018 8:57PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गीतातून कर्नाटकचे गोडवे गायल्यामुळे सीमावासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मंगळवारी आक्रमक सीमावासीयांनी पालकमंत्री पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करत, त्यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत चांगलीच झटापट झाली. 50 पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जन्मावे तर कर्नाटकात, या मंत्री पाटील यांनी म्हटलेल्या काव्याने सीमाभागासह महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वक्‍तव्याच्या निषेधार्थ पालकमंत्री पाटील यांनी माफी मागावी, तसेच राजीनामा द्यावा, या मागणीसाठी त्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यासाठी सीमावासीय मंगळवारी सकाळीच कोल्हापुरात दाखल झाले. युवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास वंदन करून कोल्हापूरकडे कूच केली. दहा वाहनांतून विविध मार्गांनी 40 ते 50 कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी सायबर चौकातून रिंगरोडमार्गे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांची वाहने थेट संभाजीनगर आगारात नेली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सीमावासीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांचा हेतू अपमान करण्याचा नव्हता. त्यांनी तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शांततेने निदर्शने करा, मात्र मंत्री पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाऊ देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. 

आंदोलक आग्रही
मंत्री पाटील यांनी आमच्या घरात येऊन आमचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणारच, असा आग्रह आंदोलकांनी धरला. मात्र, पोलिस अधीक्षक मोहिते यांनी निवासस्थानापासून शंभर फूट अंतरावर झाडाखाली तुम्ही आंदोलन करा, अशी विनंती केली. आंदोलक संभाजीनगर बस आगारातून घोषणाबाजी करत  निवासस्थानाकडे निघाले. पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाणार्‍या रस्त्यावर पोलिसांनी बॅरेकेटस् लावले होते. 

पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न
यावेळी प्रथम मुख्य रस्त्यावर आंदोलकांना रोखण्यात आले.  त्यामुळे संतप्‍त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही निवासस्थानाकडे जाणारच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. मुख्य रस्त्यापासून मोरे कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आंदोलकांनी झटापट करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यातच पोलिसांनी बळाचा वापर सुरू केला. येथून पुढे कुणालाही जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतली. सीमा प्रश्‍नासंदर्भात समन्वय मंत्रिपदाची जबाबदारी असणार्‍या नेत्याने असे कर्नाटकचे गोडवे गाऊन बेळगावमधील सीमा बांधवांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

प्रचंड घोषणा
महाराष्ट्र आमचा आहे. आम्ही शांततेने जाऊन केवळ मूक निदर्शने करतो, आम्हाला निवासस्थानापर्यंत सोडा, अशी विनंतीही आंदोलकांनी पोलिस प्रशासनाला केली. मात्र, आंदोलन, भाषणे  येथेच करा, पुढे जाता येणार नाही, असे पोलिस अधीक्षक मोहिते यांनी आंदोलकांना  समजावले. त्यावर तुम्ही हात जोडू नका, आम्हीच साष्टांग नमस्कार घालतो. मात्र, आम्हाला निवासस्थानापर्यंत सोडा, असा आग्रह आंदोलकांनी धरला. आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानेच सीमालढा लढत आहोत, असा इतिहास आहे. त्यामुळे आमच्यावर विश्‍वास ठेवा, असे वारंवार आंदोलक पोलिसांना सांगत होते. पोलिस मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम होते. ‘बेळगाव आमच्या हक्‍काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्‍त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे’, ‘चंद्रकांत पाटील यांचा धिक्‍कार असो’, ‘चंद्रकांत पाटील राजीनामा द्या,’ ‘कर्नाटकचे गोडवे गाणार्‍या मंत्री चंद्रकांत पाटील यांचा धिक्‍कार असो’ यासह अन्य विविध घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या घरात जाऊ देणार नसला, तर आम्हाला महाराष्ट्रात कसे घेणार, असा सवाल आंदोलकांनी केला. निवासस्थानाकडे सोडा, आता आम्ही कमी आहोत, नंतर मात्र हजारो कार्यकर्ते घेऊन येऊ, असा इशारा दिला. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलने केली आहेत. मग मंत्र्यांच्या दारात का सोडत नाही, असा संतप्‍त सवाल आंदोलकांनी केला. आम्ही निवासस्थानाकडे जाणारच, तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम करतो, असा इशारा देत आंदोलकांनी निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला.

जोरदार झटापट
जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी पोलिसांचे कडे आणि बॅरेकेटस् ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली. सुमारे पाऊण तास सुरू असणार्‍या झटापटीत धक्‍काबुक्‍की करून आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

कार्यकर्त्यांचा ठिय्या;उचलून नेऊन अटक
ताब्यात घेण्यास सुरुवात करताच आंदोलकांनी विशेषत: महिलांनी जमिनीवर ठाण मांडले. मात्र, पोलिसांनी प्रथम पुरुष कार्यकर्त्यांना अक्षरश: ओढून उचलून नेत पोलिस व्हॅनमध्ये बसविले. तर महिला आंदोलकांनी ठाण मांडताच महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस जीपमध्ये बसविले. आंदोलकांनी पोलिस वाहनात जोरदार घोषणाबाजी करून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पालकमंत्री पाटील यांनी माफी मागावी, अशा घोषणा दिल्या. सुमारे पावणेएकच्या सुमारास सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन अलंकार हॉलमध्ये ठेवण्यात आले.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते, उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर सूरज गुरव, पोलिस निरीक्षक अनिल गुजर, संजय साळुंखे, वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

आंदोलनात मदन बामणे, सूरज कणबरकर, पीयूष हावळ, सुनील बाळेकुंद्री, बेळगावच्या माजी महापौर सौ. सरिता पाटील, माजी उपमहापौर सौ. रेणू किल्‍लेकर, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, नगरसेवक संजय सांगावकर, प्रशांत नाईक, रत्नजित पवार, आर. सी. मुणगेकर, विक्रम पाटील, श्रीकांत कदम, अजित कोकणे,  रूपा जावळेकर,  संजय देसाई, सागर कुंभार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हुतात्म्यांची शपथ, शांततेत जातो
आंदोलकांना मोरे कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ रोखले असता, आंदोलकांनी पुढे सोडण्याची वारंवार विनंती केली. पोलिस ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने आंदोलकांनी आम्ही शांततेने जातो, आम्ही हुतात्म्यांची शपथ घेऊन सांगतो. आमच्यावर विश्‍वास ठेवा, अशी विनंती आंदोलक करत होते. 

कुंदा घेऊन आलोय, असे समजा
पाण्याच्या टाकीजवळ आंदोलकांना रोखल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांत चांगलीच झटापट झाली. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानाकडे पोलिस सोडत नसल्याचे पाहून आम्ही बेळगावहून मंत्र्यांसाठी कुंदा घेऊन आलोय, असे समजा आणि सोडा, अशी महिला आंदोलकांनी विनंती केली.

कर्नाटक पोलिसांना चांगला संदेश द्या 
आंदोलकांना मोरे कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ रोखल्यानंतर आंदोलकांनी आम्ही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहोत. कर्नाटक पोलिस आम्हाला सहकार्य करीत नाहीत. तुम्ही आम्हाला चांगले सहकार्य करा आणि महाराष्ट्र पोलिस आमच्या पाठीशी आहेत असा कर्नाटक पोलिसांना संदेश द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली.