Sat, Sep 26, 2020 23:03होमपेज › Belgaon › बेळगावात चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 

बेळगावात चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 

Published On: Jan 22 2018 9:54PM | Last Updated: Jan 23 2018 12:14AMबेळगावः प्रतिनिधी 

जन्मावे तर कर्नाटकातच, अशा आशयाचे गीत गाऊन सीमावासीयांच्या जखमांवर मीठ चोळल्याबद्दल महाराष्ट्राचे महसूलमंत्री व सीमाप्रश्‍न समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आज, सोमवारी  बेळगावात दहन करण्यात आले. तर मंगळवारी त्यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानासमोर बेळगाव-निपाणीतील युवक धरणे आंदोलन करणार आहेत. कर्नाटकाचे स्तुतीगीत गायल्यामुळे चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत असून, रात्री आठच्या सुमारास टिळक चौकात एकत्र आलेल्या युवकांनी पाटील यांच्या पुतळ्याचे दहन केले. पाटील यांच्या निषेधाच्या घोषणाही युवक देत होते.

गोकाक तालुक्यातील तवग या गावी दुर्गादेवी मंदिराचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाषणाची सुरुवात पाटील यांनी कन्‍नड स्तुतीगीताने करताना सर्व भाषिकांनी सौहार्दतेने राहावे, असे म्हटले होते. यामुळे संतापलेले युवक विशाल गौंडाडकर, किशोर मराठे, सूरज चव्हाण, विजय होनगेकर, प्रवीण भोसले, ओंकार गावडे, अश्‍वजित चौधरी यांनी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. आज धरणे

चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानासमोर मंगळवारी सकाळी धरणे धरण्याचा निर्णय बेळगाव-निपाणीतील  युवकांनी घेतला आहे. पाटील यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा  देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांच्याकडील समन्वयक मंत्रिपदाची जबाबदारी काढून घ्यावी, अशी मागणी आंदोलक करणार आहेत.

सीमालढ्याशी संबंधित असलेले युवक उद्या सकाळी 8 वाजता शिवाजी उद्यानात जमून कोल्हापूरकडे प्रस्थान करतील. निपाणीतील युवक या पथकात निपाणीतून सहभागी होतील. कोल्हापूरमधीलही काही युवक या धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती धरणे आयोजकांनी दिली. पाटील यांच्यावर सीमाप्रश्‍न समन्वयक मंत्रिपदाची जबाबदारी देऊन येत्या 25 जानेवारीला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.  

या कालावधीत त्यांनी एकदाही बेळगावला भेट दिली नाही; पण मंदिराच्या उद्घाटनाला त्यांना वेळ मिळाला. त्यातही त्यांनी कर्नाटकचे स्तुती गीत गायले. हे सीमाप्रश्‍नावरच्या मंत्र्याला न शोभणारे तर आहेत, शिवाय हा सीमावासीयांचा विश्‍वासघात  आहे, असा सूर सीमावासीयांचा असून, त्यामुळेच तातडीने धरणे कार्यक्रम आखण्यात आला आहे.