Thu, Sep 24, 2020 07:17होमपेज › Belgaon › व्यवहार बंद ठेवून तालुक्यात काळादिन

व्यवहार बंद ठेवून तालुक्यात काळादिन

Last Updated: Nov 01 2019 8:53PM
कडोली : वार्ताहर

तालुक्याच्या ग्रामीण भागात काळादिन गांभीर्याने पाळण्यात आला. सर्व व्यवहार बंद ठेवून बेळगाव येथे निघालेल्या काळादिन फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यामुळे पश्चिम भागातील बहुतांश गावातील व्यवहार सकाळच्या सत्रात ठप्प झाले होते. 

कडोलीत गावातील सर्व दुकानदार व्यापार्‍यांनी दुकाने सायंकाळपर्यंत बंद ठेवून हरताळ पाळला. यातून महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार त्यांनी प्रकट केला. केंद्र सरकारने केलेल्या  अन्यायाविरुद्धचा लढा न्याय मिळेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार केला.

गावातून शंभरहून अधिक कार्यकर्ते बेळगावातील काळादिन फेरीत सहभागी झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते बेळगावातील फेरीत सहभाग होण्यासाठी सकाळी रवाना झाले. युवकांनी दंडावर काळ्या फिती लावून गावभर सायकल फेरी काढली. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

कडोलीतील मुख्य बाजार पेठेत दुकाने बंद ठेवल्याने दिवसभर शुकशुकाट पसरला होता. यावेळी ता. पं. सदस्य उदय सिद्दण्णावर, सुनील कासार, तानाजी कुट्रे, सचिन पाटील, संभाजी पाटील आदिनी सहभाग दर्शविला होता. मेडिकल शॉप, दूध केंद्रे वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. कडोली परिसर सीमाप्रश्नासाठी कटीबद्ध असून सतत झटत राहणार आहे. सीमाप्रश्न सुटेपर्यंत हा लढा सतत सुरुच राहणार असल्याचे मत   ता. पं. सदस्य उदय सिद्दण्णावर यांनी सांगितले. 

तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी दुपारपर्यंत व्यवहार ठप्प झाले होते. मराठी भाषिकांनी काळादिन गांभीर्याने पाळला. हिंडलगा, सुळगा, तुरमुरी परिसरातील दुकाने, हॉटेल दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिसरातील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथे आयोजित केलेल्या मुख्य निषेध फेरीत सहभाग घेतला.

कानडी संघटनांचा उपद्व्याप

तालुक्याच्या पश्चिम भागात मराठी भाषिकांचे वर्चस्व अधिक आहे. यामुळे काळादिन गांभीर्याने पाळण्यात येतो. मात्र याला गालबोट लावण्याचे काम काही कानडी संघटनांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे. यामुळे मराठी भाषिक गावातून राज्योत्सव साजरा करण्यासाठी आमिष दाखवून लाल पिवळे झेंडे लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

पश्चिम भागातून फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 किणये वार्ताहर 

काळादिन सायकल फेरीत तालुक्यातील पश्चिम भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी भाषिकांना अधिक संख्येने उपस्थिती दर्शवून फेरी यशस्वी केली.

पश्चिम भागातील मच्छे, देसूर, पिरणवाडी, नावगे, रणकुंडये, किणये,  बहाद्दरवाडी, कर्ले, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळवट्टी, बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, भागातून मराठी भाषिक बेळगाव येथे निघालेल्या फेरीत सहभाग झाले होते.

या वर्षीच्योरीत ग्रामीण भागातील युवकांचा सहभाग लक्षणीय होता.  दुचाकीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला होता.  पिरणवाडी, मच्छे, किणये, बेळगुंदी, सुळगा, उचगाव, हिंडलगा गावातील मराठी भाषिक व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेऊन निषेध नोंदविला .

काळ्यादिनी कंग्राळीत कडकडीत हरताळ

कंग्राळी : वार्ताहर

1 नोव्हेबर काळादिन निषेध म्हणून कंग्राळीतील सर्व नागरिकांनी कडकडीत बंद पाळून सर्व व्यवहार ठप्प ठेवले होते. सीमाप्रश्नाच्या प्रत्येक चळवळीत गावाचा मोठा सहभाग  राहिला आहे. शुक्रवारी काळादिन गांभीर्याने पाळण्यात आला. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. 

गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी काळे टी-शर्ट, महिलांनी काळ्या साड्या, तरुणांनी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून बेळगाव शहरातील फेरीत सहभाग घेतला. गावातून निषेध व धिक्काराच्या घोषणा देत फेरी काढण्यात आली. त्यानंतर बेळगावातील फेरीत सहभागी झाले.

 "