Mon, Jan 18, 2021 15:32होमपेज › Belgaon › कर्ज परतफेडीच्या बहाण्याने ब्लॅकमेलिंग

कर्ज परतफेडीच्या बहाण्याने ब्लॅकमेलिंग

Last Updated: Dec 04 2019 1:05AM
बेळगाव ः प्रतिनिधी 

खोटा गुन्हा दाखल करून नंतर प्रकरण मिटवण्यासाठी ब्लॅकमेल करत हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीला मंगळवारी माळमारुती पोलिसांनी अटक केली.  यामध्ये दोन महिला, तीन पुरुष व एका 17 वर्षीय युवकाचा समावेश आहे. 

अटक केलेल्यांंमध्ये अलिशान शहाबुद्दिन सय्यद (काकर स्ट्रीट, कॅम्प) श्रीमती बीबीआयेशा अब्दुलसत्तार शेख (महांतेशनगर), श्रीमती हिना अक्सर सवनूर (आश्रय कॉलनी, रुक्मिणीनगर), अकीब अल्लाबक्ष बेपारी (मार्केट स्ट्रीट, कॅम्प) व सलमान गुलाज बेग (जीप बझार स्ट्रीट, कॅम्प) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात एम. एम. मुजावर यांनी माळमारुती पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः बीबीआयेशा हिने मुजावर यांच्याकडून व्यवसायासाठी सहा लाख रुपये घेतले होते. तीन महिन्यांपूर्वी ती रक्‍कम परत मागण्यासाठी गेल्यानंतर दोघांमध्ये वाद  झाला. या वादातून बीबीआयेशाने मुजावर यांच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली होती. 

रकमेच्या बहाण्याने नेले घरी

सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास मुजावर बँक कामासाठी महांतेशनगर येथील स्टेट बँकेत गेले होते. बँकेतील काम आटोपून जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या कारजवळ बीबीआयेशा व हिना या दोघी थांबल्या होत्या. ‘तुम्हाला देय असलेली रक्‍कम घरी आहे, देतो चला’, असे म्हणत दोघींनी त्यांना सोबत नेले. यावेळी घरात इतर चौघेजण आधीच थांबलेले होते. या सर्वांनी मुजावर यांना कोंडून घातले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढत त्यांच्याकडील 16,500 रुपयांची रोख रक्‍कम, मनगटी घड्याळ  काढून घातले. यानंतर त्यांचा नग्नावस्थेतील व्हिडीओ बनविला.  तसेच 5 लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्यावर बलात्काराची  तक्रार नोंदवून नग्नावस्थेतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी दिली. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी ही माहिती  मार्केटचे एसीपी नारायण बरमणी यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सोमवारी रात्री या टोळीला जेरबंद केले. 

अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली प्रोबेशनरी उपनिरीक्षक होनाप्पा तळवार, हेड कॉन्स्टेबल एम. जी. कुरेर, केंपाण्णा गौराणी, लतीफ मुशापुरी, व्ही. एच. दोड्डमणी, शिवशंकर गुडदय्यागोळ, मंजुनाथ मेलसर्ज, महिला पोलिस श्रीमती जी. के. लडंगी, श्रीमती एस. ए. घाळी यांनी ही कारवाई केली.

कशीबशी सुटका करून घेतली

धमकीमुळे मुजावर यांनी आपल्या बँक खात्यावर 2 लाख 50 हजार रुपये आहेत, ते आणून तुम्हाला देतो, असे सांगून तेथून आपली सुटका करून घेतली. यानंतर त्यांनी थेट माळमारुती पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.