होमपेज › Belgaon › बासमती भात पिकाचा १३५ एकर पट्टा होणार नष्ट

बासमती भात पिकाचा १३५ एकर पट्टा होणार नष्ट

Published On: Mar 22 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 10:37PMबेळगाव : प्रतिनिधी

हलगा ते पिरनवाडी बायपास रस्त्याला तेथील 97 टक्के शेतकर्‍यांचा कडाडून विरोध असताना तो रस्ता केंद्र सरकार कसा करणार, असा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या रस्त्यासाठी हलगा ते पिरनवाडीपर्यंत 135 एकर बासमती भात पिकाचा पट्टा नष्ट होणार आहे. शेतकर्‍यांचा नेहमी उदो उदो करणार्‍या केंद्र सरकारने त्यांच्या भावना विचारात घेतल्या आहेत का ? 

पर्यायी रस्ता म्हणून अलारवाड, ब्रह्मलिंगहट्टी (कुरबरहट्टी), मासगोंडहट्टी, अवचारहट्टी, देवगनहट्टी, येळ्ळूर ते देसूर असा रस्ता केंद्र सरकारला करता आला असता. परंतु शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी नष्ट करण्याच्या उद्देशानेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हलगा ते पिरनवाडी बायपास रस्त्याचा भूमिपूजन समारंभ शेतकर्‍यांची दिशाभूल करून करण्यात आला.

गडकरी यांनी सदर पिकाऊ जमिनीबद्दल शेतकर्‍यांचे म्हणणे, त्यांच्या भावना, जाणून घेणे महत्त्वाचे होते. परंतु शेतकर्‍यांचा सदर रस्त्यासाठी कडाडून विरोध असल्याचे समजल्याने त्यांनी व खा. सुरेश अंगडी आणि इतर भाजप नेत्यांनी शेतकर्‍यांना दूर ठेवण्याचाच प्रयत्न केला. हे त्यांना अशोभनीय आहे. केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून त्यांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला असता तर गडकरी व केंद्र सरकार शेतकर्‍यांची बाजू मांडणारे आहे असे म्हणता आले असते. परंतु गडकरी यांनी परस्पर बायपास रस्त्याचे भूमिपूजन करून आपण शेतकर्‍यांचा शत्रू असल्याचे दाखवून दिले. 

शेतकर्‍यांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाच्या ठिकाणी सध्या छोटासा रस्ता आहे. त्या रस्त्याने त्या चारही हट्टींना व येळ्ळूर, देसूरलाही ये-जा करता येते. तेथील जमीन खडकाळ असल्याने ती बायपास रस्त्यासाठी योग्य होती. परंतु केंद्र सरकारने हलगा ते पिरनवाडी या पिकाऊ जमिनीतूनच बायपास रस्ता नेण्याचा चंग बांधला आहे. यासाठी केंद्र सरकारला 900 कोटी रुपयांचा खर्च करावा लागेल. 

बायपास रस्त्याला विरोध दर्शविण्यासाठी शेतकर्‍यांनी मिळून कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. न्यायालयाने शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून बायपास रस्त्याच्या कामाला स्थगितीचा आदेश बजावलेला आहे. ‘सदर रस्त्यावर स्थगितीचा आदेश असताना तुम्ही बायपास रस्त्याचे भूमिपूजन कसे करता’ असा प्रश्‍न शेतकर्‍यांनी गडकरी यांना केला. त्यांनी उलट शेतकर्‍यांना ‘रस्ता करण्यासाठी आम्हाला कोणती अडचण नाही’, असे मग्रुरीचे उत्तर दिले आहे. 

बायपास रस्त्यासाठी 97 टक्के शेतकर्‍यांचा कडाडून विरोध आहे. केवळ 3 टक्के शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांच्या व राजकारण्यांच्या थापांना बळी पडून जमिनीची नुकसान भरपाई घेतलेली आहे. आजही बहुसंख्य शेतकर्‍यांचा बायपास रस्त्याला कडाडून विरोध असल्याचेच स्पष्ट होते.

 

Tags : belgaon, belgaon news, halga Piranwadi, 135 acres Basmati rice crop, destroyed