बेळगाव : प्रतिनिधी
पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तीनही उमेदवारांना पराभूत करून आता भाजपने पूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व मिळवले आहे. भाजपच्या आमदारांची संख्या दहावरुन तेरावर गेली असून भाजपच्या नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या सहावर जाणार आहे. एकाच जिल्ह्यात सहा मंत्रिपदे देऊन राज्याचा इतर भागांबरोबर ते कसा समतोल साधणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गतवेळच्या निवडणुकीपासून कागवाड आणि अथणीमध्ये काँग्रेसने चांगले बस्तान बसवले होते. गोकाकमध्ये तर गेल्या वीस वर्षांपासून काँग्रेसचेच प्राबल्य होते. या पोटनिवडणुकीत हे प्राबल्य गमावण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. कागवाडमध्ये पक्षीयऐवजी व्यक्तिगत राजकारणावर निवडणूक झाली आणि याचा फायदा श्रीमंत पाटील यांना झाला.
गतवेळी अथणीतून महेश कुमठळ्ळी यांनी निसटता विजय मिळवला होता. यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी लक्ष्मण सवदी यांची त्यांना साथ मिळाल्याने आणि काँग्रेसने नवखा उमेदवार दिल्याने त्यांनी तब्बल 40 हजाराच्या मताधिक्यांनी विजय मिळवला.
गोकाकमध्ये आजपर्यंत जारकीहोळी कुटुंबीयांभोवतीच राजकारण फिरत आले आहे. अशोक पुजारी यांनी केलेल्या बंडखोरीचा याठिकाणी कोणताही प्रभाव दिसला नाही. गोकाकच्या जनतेने ज्येष्ठ बंधूलाच पसंती दिली.
या पोटनिवडणुकीत ज्या प्रकारे भाजपाने रान उठवले तसा प्रयत्न काँग्रेसमधून झाल्याचे दिसून आले नाही. सर्व मदार सिद्धरामय्या यांच्यावर होती. कर्नाटक सरकारचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असतानाही काँग्रेसने अधिक गांभीर्याने घेतल्याचे दिसले नाही. काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर त्यांची पुन्हा निजदशी होणार युती होणार की नाही, हा प्रश्न अधांतरीच होता. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मतदारांनी स्थिर सरकारसाठी भाजपालाच पसंती दिली.
पोटनिवडणुकीतील विजयामुळे भाजपचे जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी भाजपला साथ देणार्या तिघाही विजयी उमेदवारांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर उमेश कत्ती यांना पोटनिवडणुकीनंतर महत्वाच्या खात्याची जबाबदार देण्याचे आश्वासन पत्रकार परिषदेत दिले आहे. रमेश जारकीहोळी यांचे उपमुख्यमंत्री पदाशिवाय समाधान होणार नाही. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याकडे दोन उपमुख्यमंत्री पद आणि चार मंत्रिपदे गेल्यास इतर जिल्ह्यात प्रचंड नाराजी होण्याची शक्यता आहे.
चिकोडी विभागातच होणार पाच मंत्रिपदे....
चिकोडी विभागातच एका उपमुख्यमंत्रीसह चारही मंत्रिपदे गेल्यास इतर जिल्ह्यातील नेते मंडळीही नाराज होण्याची शक्यता आहे. लक्ष्मण सवदी, शशिकला जोल्ले सध्या मंत्री आहेत. यामध्ये श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी आणि उमेश कत्ती यांचा समावेश होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील इतर भागातील नेते नाराज होण्याची शक्यता आहे.
भाजपचे सरकारच मुळात बंडखोरी केलेल्या आमदारांमुळे आले आहे. यामुळे त्यांना मंत्रिपदे देण्याची अत्यावश्यकता आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना सर्व भागांशी संतुलन ठेवावे लागते. सरकार येणे हे महत्वाचे आहे. यामुळे निष्ठावंत नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही.
- आ. अभय पाटील,
बेळगाव