Sat, Sep 26, 2020 23:55होमपेज › Belgaon › मनपाची पेन्शन, लाभार्थींना टेन्शन; अजब  कारभाराचा नमुना

मनपाची पेन्शन, लाभार्थींना टेन्शन; अजब  कारभाराचा नमुना

Published On: Sep 17 2019 1:50AM | Last Updated: Sep 16 2019 11:16PM
बेळगाव : प्रतिनिधी

अजब कारभाराचा गजब नुमना मनपाच्या जुन्या इमारतीतील पेन्शन विभागामध्ये अनुभवयास मिळाला. मार्च  महिन्यात  पेन्शन वितरण करताना 42 पेन्शन धारकांच्या खात्यात 10 लाखाची अतिरिक्त उलाढाल झाली आहे. 10 ते 40 हजार रुपयापर्यंतची रक्‍कम थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांची खाती गोठवण्यात आली आहेत. त्यासंबंधी चौकशी सुरू असून पेन्शन मिळाली नसल्याने लाभार्थींच्या डोक्याला टेन्शन अशी अवस्था झाली आहे.

बेळगाव, काकती, बागेवाडी व उचगाव परिसरात पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे. अपंग, विधवा, वृद्धाप पेन्शनचा यामध्ये समावेश आहे. मार्च महिन्यात महिन्याकाठी मिळणार्‍या पेन्शनपेक्षा जादा रक्‍कम त्यांच्या खात्यात जमा झाली. 10 ते 40 हजारप्रमाणे मार्च महिन्यात 10 लाखाची उलाढाल झाली. त्यामुळे  पेन्शन  वितरणात  व्यत्यय निर्माण झाला आहे. 

जादा रक्‍कम जमा झालेल्यांचे खाते गोठवण्यात आले आहे. काही पेन्शनधारकांनी खाते गोठावण्यापूर्वी खात्यातून पैशाची उचल केली आहे. त्यासाठी अशा पेन्शनधारकाना भेटून अतिरिक्‍त जमा झालेली रक्‍कम पुन्हा जमा करा अन्यथा तुमची पेन्शन कायमची बंद केली जाईल, अशी सूचना करण्यात येत आहे. बेळगाव, काकती, बागेवाडी व उचगाव नेम्मदी केंद्राप्रमाणे प्रकरण वर्ग करण्यात आली आहेत,अशी माहिती  मनपा पेन्शन विभागातून देण्यात आली.

रक्‍कम जमा मार्चमध्ये ; कारवाई ऑगस्टमध्ये पेन्शन जमा होताना ऑनलाईन थेट खात्यात जमा होते. बंगळूर येथील पेन्शन कार्यालयात ऑनलाईन रक्‍कम जमा करताना हा प्रकार घडला आहे. यासंबंधी चौकशी करण्यासाठी एप्रिल महिन्यात चौकशीचे आदेश बेळगाव येथील पेन्शन कार्यालयातील अधिकार्‍यांना देण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कारवाईला ऑगस्ट महिन्यात सुरुवात झाली. 

चार महिने या कार्यालयातील अधिकारी कोणत्या कामात व्यस्त होते, असा प्रश्‍न पेन्शनधारक उपस्थित करत होते.जादा रक्कम जमा झाल्याची माहिती स्वत:हून काही पेन्शनधारकांनी बँकेला दिली. मात्र आमचा काही संबंध नाही असे उत्तर माहिती देणार्‍या व्यक्तीला मिळाले. त्यामुळे पेन्शनधारकांनी शांत बसणे पसंत केले.