Thu, Sep 24, 2020 06:19होमपेज › Belgaon › निपाणीत सरांची ‘छडी’ निर्णायक !

निपाणीत सरांची ‘छडी’ निर्णायक !

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 09 2018 9:26PMनिपाणी : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी आ. प्रा. सुभाष जोशी यांनी 8 रोजी घेतलेल्या मेळाव्यात भविष्यातील राजकारणाविषयी स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. पण आ. शशिकला जोल्ले यांच्याविरोधी लढण्याचे जाहीर केले आहे.

निवडणुकीत भाजप आमदारांच्या विरोधात प्रा. सुभाष जोशी राहणार, हे  स्पष्ट झाले आहे. निवडणूक स्वत: लढविल्यास होणारे धोके त्यांनी व्यक्त केल्याने निवडणूक लढविणार नसल्याचेही स्पष्ट आहे.त्यामुळे साहजिकच त्यांचा काँग्रेसला फायदा होणार असल्याने काँग्रेस गोटात उत्साह संचारला आहे.

गत निवडणुकीत आ. जोल्ले यांना निवडून आणण्यासाठी प्रा. जोशींची मतेच निर्णायक ठरली. यावेळी जुन्या अनुभवी उमेदवाराला विरोध करत विद्यमान आमदारांना निवडून आणले. पण निवडून आल्यावर आ. जोल्ले यांची विचारसरणी बदलली. प्रा. जोशी यांना जाणीवपूर्वक त्यांच्याकडून टाळाटाळ सुरु झाली.

याकाळात प्रा. जोशी यांच्या कार्यकर्त्यांनाही दुजाभावाची वागणूक मिळू लागली. त्यामुळेच प्रा. जोशी यांचा राग अनावर झाला.सध्या भाजपतर्फे आमदार शशिकला जोल्ले यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. काँगे्रसमधून माजी आ. काकासाहेब  पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे मागील झालेली चूक टाळून  काँग्रेसला मतदारसंघात गतवैभव प्राप्त होण्यासाठी संधीच आली असल्याचे म्हणावे लागेल.

आता काँग्रेसदेखील जोशी यांना कशाप्रकारे हाताळणार, यावरही बरेच अवलंबून आहे. जोशी यांनी सांगितल्यानुसार निवडणुकीतील विजयाचे पारडे कोणाकडे झुकवायचे, हे त्यांच्या गटामध्येच आहे. जोशी यांच्या भूमिकेला या निवडणुकीत मोठे महत्त्व आहे. प्रा. जोशी यांनी काँग्रेसमध्ये एकी करून लढण्याचा ज्येष्ठ म्हणून सबुरीचा सल्लाही दिला आहे. 

कार्यकर्त्यांची मोठी फौज
प्रा. जोशी यांनी आमदार म्हणून 10 वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. प्रा. जोशी चळवळीतील कार्यकर्ते असल्याने त्यांच्यामागे लढावू कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. सध्या ते हालशुगर साखर कारखान्याचे चेअरमन असून त्यांचा आपल्या कार्यकर्तृत्त्वावर विश्‍वास आहे. 

प्रा. जोशी यांनी पाठिंबा कोणाला दिला नसला तरी त्यांच्या गटाचे अस्तित्त्व अबाधित राहून भविष्यातील राजकारणाविषयी त्यांचा निर्णय निर्णायक आणि दिशादर्शक राहणार  आहे, यात तिळमात्र शंका नाही.