Tue, Jul 14, 2020 11:22होमपेज › Belgaon › बेळगाव राज्यात अव्वल, देशात 24 वे

बेळगाव राज्यात अव्वल, देशात 24 वे

Last Updated: Jun 30 2020 8:01AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

स्मार्ट सिटी योजनांच्या कामात बेळगावने सुधारणा केली असून देशात 38 व्या स्थानावरून 24 व्या स्थानी झेप घेतली आहे. बेळगाव राज्यात पहिल्या क्रमांकावर असून एकूण 360 कोटींपैकी 230 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

बेळगावात स्मार्ट सिटी कामांना 2016 पासून सुरुवात झाली; पण कामाचा वेग कमी राहिल्यामुळे महत्त्वाकांक्षी योजनेत बेळगाव मागे होते. यंदापासून कामाला वेग आला असून बेळगावने 14 स्थानांची प्रगती करत 24 व्या स्थानी झेप घेतली आहे.केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेला 196 कोटी रुपये दिले आहेत. तर राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले आहेत. केंद्राने दिलेले सर्व 196 कोटी रुपये विकास कामांवर खर्चण्यात आले आहेत. राज्याने दिलेल्या निधीपैकी 34 कोटी 8 लाख खर्च करण्यात आला आहे. 

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेने यंदा मार्चमध्ये तब्बल 28 कोटी 25 लाख रुपये खर्च केले. आतापर्यंतचा हा सवार्ंत मोठा खर्च आहे. फेब्रुवारी महिन्यात 25 कोटी 44 लाख, जून महिन्यांत 23 कोटी 29 लाख खर्च करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही काही प्रमाणात काम करण्यात आले असून एप्रिल महिन्यांत 2 कोटी 84 लाख, मे महिन्यांत 6 कोटी 8 लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.


स्मार्ट सिटी कामांना गती आली आहे. डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण होतील. लॉकडाऊनच्या काळात घरी परतलेले कामगार कामावर परतत आहेत. 
शशिधर कुरेर, व्यवस्थापकीय संचालक, स्मार्ट सिटी योजना