Sat, Feb 29, 2020 18:16होमपेज › Belgaon › अंबाबाई देवस्थानाला 117 वर्षांची परंपरा

अंबाबाई देवस्थानाला 117 वर्षांची परंपरा

Published On: Sep 30 2019 1:45AM | Last Updated: Sep 29 2019 10:55PM
बेळगाव : प्रतिनिधी

आदिमाया, आदिशक्‍ती, कालिका अशी दुर्गामातेची अनेक नावं... लक्ष्मी, महालक्ष्मी, अंबाबाई, महिषासुरमर्दिनी अशी अनेक रूपं... बेळगावातही देवीची अनेक मंदिरं आहेत. नवरात्रानिमित्त या मंदिरांची ओळख आजपासून पुढचे नऊ दिवस...

खडेबाजार, नाथ पै सर्कल, शहापूर येथील अंबाबाई मंदिराच्या स्थापनेला 117 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1902 मध्ये सोमवंशीय सहस्रार्जुन समाजातील धुरिणांनी या शक्‍तिपीठाची स्थापना केली. देवस्थानात नवरात्रौत्सवासह भंडारा उत्सव, जयंती उत्सव  साजरा करण्यात येतो.

सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे मूळ स्थान आजच्या बलुचिस्तानात मानले जाते. तेथील  हिंगलाजमाता ही आराध्यदेवता आहे. इस्लामिक आक्रमणाच्या काळात साधारण 1000 वर्षांपूर्वी समाजाने स्थलांतर केले. 

बेळगावात हा समाज 19 व्या शतकात शहापूर, वडगाव व खासबाग भागात स्थायिक झाला.  एक जुने कौलारु घर विकत घेऊन समाजातील तत्कालीन मंडळींनी दगडी गाभारा बांधून अंबामातेची प्राणप्रतिष्ठापना 1902 मध्ये केली. अंबामातेची मूर्ती ही गोकाक येथील शिल्पकाराने खास पाणथळ पाषाण वापरुन बनवली आहे. मूर्ती अचल असून, ती सालंकृत आहे. मूर्तीच्या कपाळावर शिवलिंग असल्याने ती शंभोभवानी असून, महिषासूरमर्दिनीच्या रूपात आहे. 

1962 मध्ये मूर्तीस वज्रलेप करण्यात आला होता. मंदिरात रोज सकाळी उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात येतो. दर मंगळवारी रात्री 8 वा. देवीचा पालखी उत्सव आणि महाआरती होते. 1974 मध्ये या ठिकाणी चार मजली इमारतीची उभारणी करण्यात आली. समाजाचा कारभार तीन ट्रस्टी आणि अकरा नियुक्‍त संचालकांतर्फे करण्यात येतो. महिलांच्या आदीशक्‍ती महिला मंडळाचाही विविध कार्यक्रमांत सहभाग असतो. या मंडळाने मंदिरात चांदीची पालखी, चांदीचे मखर, चांदीचे कवच, चांदीची चौकट आणि दरवाजा बनवून दिला आहे.

वसंत सातारकर, रमेश धोंगडी व पितांबर रंगरेज हे तीन ट्रस्टी असून, पंचमंडळात अकरा जणांचा सहभाग आहे. अध्यक्ष अशोक चव्हाण असून, उपाध्यक्षपदी प्रभाकर चौधरी आहेत. मनोहर जरतारकर हे सेक्रेटरी असून, सतीश कल्पवृक्ष हे खजिनदाराचा पदभार सांभाळत आहेत.