Sat, Feb 22, 2020 10:10होमपेज › Belgaon › शेतात गाळून घाम, जमवला मूर्तीसाठी दाम!

शेतात गाळून घाम, जमवला मूर्तीसाठी दाम!

Published On: Sep 06 2019 1:42AM | Last Updated: Sep 06 2019 1:42AM
किणये : वार्ताहर

सार्वजनिक गणशोत्सव म्हणजे सक्‍तीची वर्गणी वसूल करणे, हे समीकरण तयार झाले आहे. परंतु, बहाद्दरवाडी येथील युवकांनी शेतातील कामे एकत्रितपणे करून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. त्यानंतर हा उत्सव 45 वर्षे अविरतपणे सुरू आहे. काळाच्या ओघात यामध्ये बद्दल घडत चालला आहे. परंतु उत्साह कायम आाहे. गावात एक गाव एक गणपती साजरा करण्यात येतो. उत्सवाच्या निमित्ताने सारा गाव एकवटतो. शेतात राबून पैसा जमवण्यापासून सुरू झालेला हा उत्सव जोमात सुरू आहे. काही काळानंतर घरटी एक रुपया वर्गणी जमा करण्यात येत असे. यावर्षी 30 रु. प्रत्येक घरातून वर्गणी जमा करण्यात आली.

बहाद्दरवाडी  येथील गणेशोत्सव मंडळाचे  यंदाचे 45 वर्ष  आहे. न 1974 साली  गावात ‘एक गाव एक गणपती’ पासून संकल्पना रुजवली आहे. गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी गावात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय 1974 ला घेतला. यासाठी ग्रामदैवत  ब्रह्मलिंग मंदिरात एका बाजूला गणेश मूर्ती स्थापना करून उत्सवाला सुरुवात केली.

बहाद्दरवाडी हे गाव शेतीप्रधान आहे. प्रारंभीच्या काळात कोणाकडूनही वर्गणी जमा करण्यात येत नव्हती.  मंडळातील कार्यकर्ते भाताची मळणी, शेतीची कामे करून उत्सवाला आवश्यक रक्‍कम जमा करत. यातून गणेशोत्सव थाटात साजरा करण्यात येत असे.शेतातील विविध कामे काही ठराविक रक्‍कम ठरवून घेत व  या कामातून मिळणार्‍या पैशांमधून गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता. 1994 साली श्री ब्रह्मलिंग युवक मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये मल्लाप्पा पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून या वर्षी पर्यंत सलग पंचवीस वर्षे ते प्रामाणिकपणे अध्यक्षाची धुरा सांभाळत  आहेत.

पंचवीस वर्षापासून ब्रह्मलिंग मंदिरासमोर मंडप घालून गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली . पहिल्यांदा पाच रुपये  वर्गणी जमा करण्यात येऊ लागली.  मात्र सध्या प्रत्येक कुटुंबाकडून 30 रुपये प्रमाणे वर्गणी आकारण्यात  येत आहे. मंडळाने काही वर्षापासून डॉल्बीला पूर्णपणे फाटा दिला असून गणपतीच्या आगमनादिवशी आणि विसर्जनादिवशी ढोल, ताशा, ,टाळ-मृदंग, लेझीम आधी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात येतो. मुलांसाठी लिंबू चमचा,संगीत खुर्ची, डोळ्याला पट्टी बांधून नारळ फोडणे आदी स्पर्धा आयोजित करण्यात येत असत. यामुळे लहान मुलांना प्रोत्साहन लाभत असे. परंतु सध्या हा उपक्रम बंद करण्यात आला आहे. हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. यातून विद्यार्थी आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन लाभते. 

सुरुवातीला घरटी पाच रुपये  वर्गणी तर आता 30 रु वर्गणी आकारण्यात येत आहे 

1974 ला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात

1994  ब्रह्मलिंग युवक मंडळाची पुनर्रचना

गावातील युवकांसह वृद्धांचाही सहभाग

गणेशोत्सव मंडळाकडून गावात विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन