Thu, Feb 20, 2020 19:57होमपेज › Belgaon › ‘कडकनाथ’चा अडीच कोटींचा झटका

‘कडकनाथ’चा अडीच कोटींचा झटका

Published On: Sep 10 2019 1:18AM | Last Updated: Sep 10 2019 1:18AM
बेळगाव : प्रतिनिधी

इस्लामपूर (जि. सांगली) येथील कडकनाथ कंपनीने बेळगाव जिल्ह्यातील शकडो पोल्ट्रीफॉर्म सुरू  करून लाखो रूपयांची गुंतवणूक केली. यातून विश्‍वास संपादन करून गत दोन वर्षात 2 कोटी 66 लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. 

या कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रथम व्यावसायिकांना एक लाख रूपयांची गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. या मोबदल्यात शंभर पक्षी देण्यात आले.  यानंतरच्या काळात सदर पक्ष्यांपासून उत्पादित होणार्‍या प्रति अंड्याला 60 दर देणार असल्याचे सांगण्यात आले. अंडी उत्पादनाला सुरुवात झाल्यानंतर मात्र अंड्यांची वेळेत उचल होत नव्हती. तसेच ज्या अंड्यांची उचल झाली त्याचे पैसे वेळेत मिळत नव्हते. दरम्यानच्या दीड वर्षातील काळात कपंनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने व्यावसायिकांचीही गोची झाली. कंपनीकडून खाद्यही येणे बंद होत गेले. खाद्य, भांडी, औषधे मिळण्यात गेल्या 6 महिन्यापासून अनियमितता सुरु झाली. याबाबत विचारले असता कंपनीच्या कार्यालयातून थातूरमातूर उत्तरे देण्यात येत होती. गत फेब्रुवारीपासून कंपनीचे व्यवहार संशयास्पद वाटू लागले. यानंतर कंपनीकडून पुन्हा कडकनाथ कोंबड्याविषयी मोठ्याप्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली. यानंतर पुन्हा काही नागरिक या कंपनीच्या भुलभलैय्यात अडकले. काहीजणांनी आगाऊ पैसे देऊन पक्ष्यांचे बुकिंग केले. मात्र त्यांनाही पक्षी मिळाले नाही. यानंतर कंपनीच्या संचालकांनी पलायन केल्यानंतर कार्यालयेही  बंद होत गेली. 

रयत ऑग्रो इंडिया कंपनीचा मोहिते नामक मालक बेळगाव येथे एक कोटींची मर्सिडीजबेंज घेऊन अनेकवेळा येऊन गेला आहे. त्याचा राहणीमान पाहूनही बेळगावातील अनेकजण फसी पडले आहेत.  रयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीने कडकनाथ कोंबडीचे मटण 500 रु. किलोला मागणी आहे असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात याला फारशी मागणी नाही. याउलट कंपनीचा विनाकारण विस्तार वाढत गेला. परिणामी कंपनीकडे कोट्यवधींचे भांडवल वाढत गेले. यातून मोठी फसगत झाली. 

प्रचाराचा परिणाम

कडकनाथ पक्षी पालनाचा यशस्वीमंत्र  म्हणून एका खासगी दूरचित्रवाणीवरून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली. प्रत्यक्षात या व्यवसायाची व्हिडीओद्वारे माहिती मिळत गेल्याने हजारो लोकांनी यामध्ये गुंतवणूक केली.