Sat, Feb 29, 2020 20:06होमपेज › Belgaon › जिल्हा क्रीडा वसतिगृहाचा कारभार व्यवस्थापकाविना

जिल्हा क्रीडा वसतिगृहाचा कारभार व्यवस्थापकाविना

Published On: Oct 05 2019 12:32AM | Last Updated: Oct 05 2019 12:32AM
बेळगाव : शिवप्रसाद आमणगी

येथील सुसज्ज जिल्हा क्रीडा वसतिगृहाचा कारभार 8 महिन्यांपासून व्यवस्थापकांविनाच चालत आहे. रिक्‍त पद न भरल्याने विविध खेळांच्या प्रशिक्षकांवरच वसतिगृहाचा गाडा हाकण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.

येथील क्रीडा वसतीगृहात कुस्तीचा सराव करणारी 96 मुले आणि मुली आहेत. ज्युदोसाठी 58 मुले आणि मुली आहेत. अ‍ॅथलेटिक्सचा सराव करणारी 12 मुले आणि मुली आहेत. तर व्हॉलीबॉलचा सराव करणारी 1 मुलगी आहे. कुस्तीसाठी नागराज हे प्रशिक्षक आहेत. ज्युदोसाठी रवी हे प्रशिक्षक आहेत. अ‍ॅथलेटिक्ससाठी संजयकुमार नाईक प्रशिक्षण देतात. व्हॉलीबॉलसाठी बसवराज होसमठ प्रशिक्षक आहेत. येथे मुलांसाठी सार्‍या चांगल्या सुविधा आहेत. सरकारी इमारत असूनही येथील स्वच्छता आणि टापटीपपणा वाखाणण्यासारखा आहे.

येथील अनेक मुलांनी चांगल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. मात्र, प्रशिक्षकांना व्यवस्थापक  नसल्याने व्यवस्थापन करण्यासाह प्रशिक्षणाचीही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. पाचवी ते सातवीपर्यंतच्या प्रत्येक मुलांसाठी 175 रू. आणि त्यापुढील मुलांसाठी 200 रू. प्रतिमहिना शासन खर्च करते. वसतिगृहात खेळाडूंसाठी उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध आहे. वसतिगृहात खेळाडूंना सकस आहार दिला जातो, असे येथील अटेंडंट सतीश दोडमणी यांनी सांगितले. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय नसल्याने सध्या शेजारीच मुलींसाठी नविन सुसज्ज वसतिगृहासाठी बांधकाम सुरू आहे.

गेल्या 7-8 महिन्यांपासून वसतिगृहाचे व्यवस्थापक पद रिक्त आहे. आम्ही प्रशिक्षकच मुलांना प्रशिक्षण देण्याबरोबर व्यवस्थापनही पाहत आहे.
-नागराज, कुस्ती प्रशिक्षक