Wed, Apr 01, 2020 00:55होमपेज › Belgaon › सावधान... वाहतूक नियम पाळा

सावधान... वाहतूक नियम पाळा

Published On: Sep 02 2019 1:29AM | Last Updated: Sep 01 2019 10:59PM
बेळगाव : प्रतिनिधी

केंद्र सरकारने नव्या मोटार वाहतूक कायद्याची पुनर्रचना केली आहे. यामध्ये नियमबाह्य वाहनधारकांना दंडाची मोठी तरतूद करण्यात आली आहे. नवीन नियमांच्या अंमलबजावणीस रविवार, दि. 1 पासून प्रारंभ झाला आहे.  500 रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून काही नियम भंग केल्यास 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.  

वाहतुकीचे नियम पाळण्यात येत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये अनेकांचा नाहक बळी जातो. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेण्यात आली असून केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने नव्या दंडाची अंमलबजावणी सुरू केली आहे. आहे. अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालवून गुन्हा केल्यास दुचाकी मालकासह पालकांनाही शिक्षेची तरतूद आहे. दुचाकीस्वारांना कायमस्वरुपी चालक परवाना मिळविण्यासाठी जादाच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. 

केंद्र सरकारच्या धोरणानुसार नव्या मोटार वाहतूक कायद्यात 63 तरतूदी लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत वाहतूक कायद्यात दुरुस्तीला मंजुरी मिळविली आहे. काही नियमभंग करणार्‍यांना दंडाची रक्‍कम अनेक पटीने वाढवली आहे. वाहन परवाना नसताना वाहन चालविल्यास यापूर्वी 500 रुपये असणारा दंड आता 5 हजार रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. तर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास 400 रुपयांऐवजी 2 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.रुग्णवाहिकेला वाट करुन न दिल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.