Mon, Sep 21, 2020 18:21



होमपेज › Belgaon › बँक क्‍लार्ककडून पत्नीचा खून

बँक क्‍लार्ककडून पत्नीचा खून

Last Updated: Feb 15 2020 12:52AM

मयत कविता परशुराम पिसे



बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

पती-पत्नीच्या भांडणात पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. कविता परशुराम पिसे (वय 30, मूळ रा. गुलबर्गा, सध्या रा. विजयनगर, बेळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. संशयित परशराम पिसे हा एका राष्ट्रीयीकृत बँकेत क्‍लार्कम्हणून कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशराम व कविता यांचा विवाह होऊन आठ वर्षे झाली. परशराम हा विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी येथील असून नोकरीच्या निमित्ताने हे कुटुंब विजयनगर येथे भाडोत्री घरात राहते. त्यांना सहा वर्षांची तसेच दुसरी सहा महिन्यांची मुलगी आहे.

गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास पत्नीने परशरामला बँकेतून घरी बोलावून घेतले. एलकेजीमध्ये शिकणार्‍या मुलीला शाळेतून आणण्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर दोघांचे भांडण विकोपाला गेले. रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळला. दुपारी 2 पासून तो व सहा महिन्यांची चिमुकली घरी होते. पत्नी निपचित पडल्याने तोही अस्वस्थ बनला. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत तो अशाच स्थितीत घरी बसून होता. बाळाचे रडणे, शाळेतून घरी आलेल्या मुलीचे रडणे असह्य होऊन त्याने आपल्या घरी विजापूरला तसेच सासरवाडीला फोन करून पत्नीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला; परंतु डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. दुपारीच तिचा मृत्यू झाला होता; परंतु घरच्यांच्या सांगण्यानुसार तो हॉस्पिटलला गेला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता प्रथमदर्शनीच गळा दाबल्याचे व्रण आढळून आले. आधी पोलिसांनाही तो झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचेच सांगत होता. परंतु, पोलिसांनी विचारणा केली असता त्याने कबूल केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कॅम्पचे  प्रभारी निरीक्षक धीरज शिंदे अधिक तपास करत आहेत.





 







"