Sat, Feb 29, 2020 12:29होमपेज › Belgaon › नंदीहळ्ळींची आत्महत्याच?

नंदीहळ्ळींची आत्महत्याच?

Published On: May 07 2019 1:57AM | Last Updated: May 06 2019 11:48PM
बेळगाव ः प्रतिनिधी 

ज्या अरुण नंदीहळ्ळी यांच्या खून प्रकरणाने बेळगाव शहर हादरले, ते एकूण प्रकरण भलतेच निघाले. देणेकर्‍यांचा त्रास होतोय म्हटल्यानंतर  स्वतःच्या दंडात गोळी झाडून घ्यायची व पैसे न दिल्याने एकाने हल्ला केला, असे भासवायचे, असे नियोजन नंदीहळ्ळी कुटुंबाचे होते. नियोजनानुसार घरापासून काही अंतरावर जाऊन नंदीहळ्ळींनी गोळी झाडून घेतली खरी. परंतु, ती दंडाला न लागता थेट हृदयात घुसली अन् त्यांचा मृत्यू झाला. पोलिस तपासात हे धक्‍कादायक सत्य समोर आले आहे. ही सर्व खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली माहिती असून, लवकरच पोलिसांकडून याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

19 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास अरुण नंदीहळ्ळी हे त्यांच्या दुसर्‍या पत्नीचे माहेर धामणेहून शहापूरला घराकडे परतत होते. धामणे-जुने बेळगाव मार्गावर धामणेपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर गेल्यानंतर त्यांचा खून झाल्याची वार्ता शहरभर पसरली. त्यांची पत्नी मंगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याची पोलिसांत नोंद देखील अशीच झाली.  पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा देखील दाखल झाला. परंतु, या संपूर्ण प्रकरणालाच आता कलाटणी मिळाली आहे. 

पैशाच्या तगाद्यामुळे अस्वस्थ 

माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी स्थापन केलेल्या विश्‍वभारत सेवा समिती शिक्षण संस्थेतील अधिकारावरून भावांमध्ये  20 वर्षांपासून वाद आहे. या संस्थेत नोकरी लावण्याचे सांगून अरुण नंदीहळ्ळी यांनी अनेकांकडून रक्‍कम घेतली होती. ही रक्‍कम सुमारे 80 लाखांहून अधिक होती. ज्यांनी पैसे दिले, त्यांना संस्थेत नोकरीही लागत नव्हती आणि अरुण हे रक्‍कम देखील परत देत नव्हते. त्यामुळे पैसे देणार्‍यांनी रक्‍कम परत देण्याचा सातत्याने तगादा लावला होता. यामुळे अरुण नंदीहळ्ळी  व त्यांचे कुटुंब देखील अस्वस्थ होते. यासाठी करायचे काय, तर त्यावर त्यांनी  देणेकर्‍यांना भिती घालण्याचा कट शिजवला आणि पुढचे सगळे घडले. 

चौघांनी एकत्रित केला कट 

19 मार्च रोजी अरुण नंदीहळ्ळी हे पत्नी मंगलसोबत धामणेला गेले. देणेकर्‍यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी  काय करायचे? यासाठी अरुण, त्यांची पहिली पत्नी मंगल, दुसरी गीता व गीताचा भाऊ मोहन यांची चर्चा झाली. आपण जर दंडावर गोळी मारून घेऊन देणेकर्‍याने हल्ला केल्याचे भासविले तर काही दिवस तरी देणेकर्‍यांचा तगादा कमी होईल, या निष्कर्षापर्यंत ते आले. त्यानुसार सर्व ते आधीच नियोजन झाले होते. 

‘त्या’ दिवशी नेमके काय घडले?

स्वतः दंडावर गोळी मारून  घ्यायची असेल, तर तशी सुनसान जागा हवी. तुम्ही कार घेऊन पुढे रस्त्यावर जाऊन दंडात गोळी मारून घ्या. आम्ही दहा मिनिटात पोहोचतो, असे या चौघांचे ठरले.  रात्री जेवण करून दहा वाजता अरुण घरातून बाहेर पडले. ते दहा मिनिटाच्या अंतरावर आले व त्यांनी ठरल्याप्रमाणे गोळी मारून घेतली. 

गोळी दंडाऐवजी द्नदयात

ते पुढे पोहोचल्यानंतर त्यांनी गोळी मारुन घेतली असेल, असे समजून दहा-पंधरा मिनिटांनी त्यांच्या दोघी पत्नी व मेहुणा घटनास्थळी आले. परंतु, त्यावेळी गोळी त्यांच्या दंडात घुसण्याऐवजी थेट द्नदयात घुसली होती. या तिघांना हे पाहून धक्काच बसला. त्यांचा श्‍वास तपासून पाहिला, तर  ते निपचीत पडले होते. करायला गेलो आणि झाले भलतेच, असे त्यांनाही जाणवले. मग पुढे हा खून आहे, हे भासविण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू झाले. 

बंदूक पुरली तेथेच 

अरुण यांनी झाडून घेतलेली गोळी सापडली नाही. परंतु, बंदूक तेथेच पडलेली होती. त्यांच्या मेहुण्याने ती बंदूक घेतली व बाजूलाच शेतवडीत पुरली. ती देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यानंतर  मंगल यांनी एका महिला सामाजिक कार्यकर्तीला बोलावून घेऊन आपल्या पतीचा खून झाल्याचा बनाव केला. त्यांना जिल्हा रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

तिघांकडून कबुली

जे काही घडले आहे, त्या सर्व घटनेचा कबुलीनामा दोघी पत्नी व एकीचा भाऊ या तिघांनी सोमवारी सेक्शन 164 अंतर्गत न्यायालयासमोर दिलेला आहे. परंतु, आणखी थोडासा तपास बाकी असल्याने पोलिसांनी याची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.