Wed, Sep 23, 2020 21:29होमपेज › Belgaon › पोलिसांचा आज न्यायालयात खुलासा

पोलिसांचा आज न्यायालयात खुलासा

Published On: Nov 07 2018 1:30AM | Last Updated: Nov 06 2018 10:51PMबेळगाव : प्रतिनिधी 

दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये म. ए. समितीतर्फे काळा दिन सायकल फेरीवेळी कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी पोलिस न्यायालयात बुधवारी (दि. 7) खुलासा करणार आहेत. न्यायालयाने पोलिसांना तसा आदेश बजावला आहे. समिती कार्यकर्त्यांच्यावतीने पोलिसांनी केलेल्या मारहाणीविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.

दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये काळा दिन सायकल फेरीनंतर शहापूर पोलिसांनी फेरीत सहभागी झालेल्या म. ए. समितीच्या 43 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिस स्थानकात कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. याबाबतची सुनावणी तिसर्‍या जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. समिती कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या विरोधात पोलिसांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयाने मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांची फेर वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये मारहाण केल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे न्यायालयाने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.पोलिसांनी न्यायालयात कारणे दाखवा नोटिशीला उत्तरे देण्यास टाळाटाळ केली आहे. मात्र, न्यायालयाने याबाबत अंतिम मुदत दिली असून पोलिस बुधवारी न्यायालयात खुलासा करणार आहेत. यामुळे मराठी भाषिकांत उत्सुकता निर्माण झाली आहे. न्यायालयात पोलिस कोणता खुलासा करणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

न्यायालयाने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. म. ए. समिती कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या अमानूष मारहाण प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. मराठी कार्यकर्ते निर्दोष असून पोलिस कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहेत.- अ‍ॅड. महेश बिर्जे, वकील