Sat, Feb 29, 2020 19:29होमपेज › Belgaon › बेळगाव : जांबोटीजवळ भीषण अपघातात ट्रक- बस जळून खाक; ४ प्रवासी भाजून जखमी (video)

बेळगाव : जांबोटीजवळ भीषण अपघातात ट्रक- बस जळून खाक; ४ प्रवासी भाजून जखमी (video)

Published On: Sep 24 2019 9:14AM | Last Updated: Sep 24 2019 12:52PM
खानापूर/किणये : प्रतिनिधी

सोमवारी रात्री १२:३० च्या सुमारास बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावर कालमणी (ता. खानापूर, जि. बेळगाव) क्रॉसपासून काही अंतरावर असलेल्या ढाब्याजवळ दूंडरगी-पणजी बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यामुळे   दोन्ही गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. 

बसमधील ३ ते ४ प्रवासी किरकोळ भाजून जखमी झाले आहेत. मध्यरात्रीची वेळ असल्याने बसमध्ये मोजकेच प्रवासी होते. त्यामुळे आगीचा भडका उडाल्यानंतर उतरण्यासाठी चेंगराचेंगरी न होता पुरेसा वेळ मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.

सोमवारी रात्री  ८ च्या सुमाराला कर्नाटक परिवहन मंडळची बस गोव्यावरून दूंडरगी (कर्नाटक) ला निघाली होती. रात्री साडेबाराच्या सुमाराला कालमणी क्रॉस जवळ बेळगाववरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला जोराची धडक बसली. बसच्या धडकेत ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने घर्षणाने दोन्ही वाहनांनी पेट घेतला.

 चालक व वाहकाने खाली उतरून ताबडतोब बस मधील सर्व २१ प्रवाशांना उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

काही प्रवासी झोपेत असल्याने त्यांना बाहेर काढेपर्यंत आगीने संपूर्ण बसला वेढले. त्यामुळे ३ ते ४ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी प्रथम जांबोटी उपठाण्यातील पोलिस दाखल झाले. त्यानंतर रात्री १ च्या सुमारास खानापूर पोलिस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. 

मंगळवारी सकाळी दोन्ही वाहने बाजूला करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

बसने ट्रकच्या डिझेल टाकीला धडक दिल्याने टाकी फुटून बाजूला पडली. त्यानंतर काही क्षणातच दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने प्रवाशांना वाहनातून खाली उतरण्यासाठी केवळ एक ते दोन मिनिटांचाच वेळ मिळाला. प्रवाशांच्या साहित्यसह परिवहन विभाग व ट्रक मालकाला लाखोंचे नुकसान सहन करावे लागले आहे.