Fri, Feb 28, 2020 23:59होमपेज › Belgaon › आझमनगरला फलक लावण्यावरून राडा

आझमनगरला फलक लावण्यावरून राडा

Last Updated: Nov 11 2019 1:32AM
बेळगाव : प्रतिनिधी  

शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात सुरू असताना उत्सवाच्या शुभेच्छा फलक लावण्याच्या कारणावरून एकाच समाजातील युवकांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास  आझमनगर परिसरात घडली. दुसर्‍या घटनेत आझादनगरमध्येही दोन गटांत धुमश्चक्री उडाली. 

आझमनगर येथे ईदनिमित्त विद्युत रोषणाई करून उत्सवासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. स्वागत कमानीशेजारी माजी आमदारांच्या समर्थकांकडून शुभेच्छुकांच्या छायाचित्रांसह ईदच्या शुभेच्छा देणारा फलक लावण्यात आला होता.

दरम्यान, यावर दुसर्‍या गटातील तरुणांनी आक्षेप घेतला व वादाला कारण ठरले. यावरून एकत्र आलेल्या दोन्ही गटांतील तरुणांनी फलक लावण्यावर आक्षेप घेतला. लावलेला शुभेच्छा फलक उतरविण्यास एका गटाने विरोध केला, तर दुसर्‍या गटाने फलक उतरविण्याचा हट्ट धरला. यावरुन निर्माण वाद निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच एपीएमसीचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी घटनास्थळी दाखल झाले व प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांची वादावादी सुरुच होती. 

इतक्यात काही जणांनी लावण्यात आलेला शुभेच्छा फलक उतरविला व त्याची मोड तोड करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शुभेच्छा फलक लावण्यात आलेेल्या गटातील तरुणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावरुन एकमेकांत तुंबळ हाणामारी झाली. रस्त्याकडेला घर बांधण्यासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये उडी घेऊन या युवकांमध्ये फिल्मी स्टाईलने फायटिंग सुरू झाली. पोलिस निरीक्षक समोर असताना एकमेकांचे शर्ट फाडण्यापर्यंत मजल गेली. युवकांची गर्दी वाढल्याने अधिक पोलिस बोलावून प्रकरणावर पडदा टाकला.  यामुळे आझमनगर ते एपीएमसी रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. तर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनाही आवरेनात तरुण
दोन्ही गटातील तरुण पाण्याच्या खड्ड्यात फिल्मी स्टाईलने मारमारी करीत होते. पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी बाजूला असताना देखील त्यांची मारामारीपर्यंत मजल गेली. पोलिसांकडून मारामारी सोडविण्याचा सुरू असलेला केवीलवाणा प्रयत्न नागरीकातून चर्चेचा विषय ठरला. पोलिस एकेकाला बाजूला सारत असतानाही ते एकमेकांवर धावून जात होते.