Sat, Sep 26, 2020 23:24होमपेज › Belgaon › निवडणूक प्रचाराची धुरा महिलांवर

निवडणूक प्रचाराची धुरा महिलांवर

Published On: May 03 2018 12:15AM | Last Updated: May 02 2018 11:41PM बेळगाव :  प्रतिनिधी 

स्वयंपाकघरात रमणारे हात सध्या भित्तीपत्रकापासून माहितीपत्रक वाटण्यात गुंतले आहेत. पहाटे उठून, संसार, घरकाम या सर्वांचे नियोजन करत दिवसभर प्रचारासाठी ‘डोअर टू डोअर’जात कॅम्पेनिंग करणार्‍या महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे.महिला कार्यकर्त्यांची झपाट्याने वाढणारी संख्या आणि प्रचारातील अनेक महत्वाच्या बाबींचे नियोजन पेलणार्‍या महिला कार्यकर्त्यां हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. प्रचाराशिवाय महिला उमेदवारांचा सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा काही कार्यकर्त्या सांभाळत आहेत.

राज्यातील निवडणुकांची तुतारी वाजली आहे. प्रचारालाही धार झाली आहे. पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिलाही आवर्जून सहभाग घेत आहेत. उमेदवारांच्या प्रचारात महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती प्रामुख्याने दिसतेच, पण पुरुष उमेदवारांच्या प्रचारातही त्यांच्या बरोबरीने महिला उतरल्या आहेत. ज्या पक्षाकडे महिला कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे, त्या उमेदवाराचा प्रचार तगडा होतो. महिला कार्यकर्ते हे मतदारांच्या घरात चुलीपर्यंत जाऊन मनपरिवर्तन करू शकतात. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांचा प्रचार त्या त्या उमेदवारांकरिता निर्णायक ठरणार आहे. 

हातात उमेदवारांची माहितीपत्रके, डोक्यावर टोपी, रंगीबेरंगी साडी नेसून, प्रचार पत्रकांच्या वाटपापासून ते भेटीगाठीपर्यंतच्या कामात भाग घेणार्‍या महिला कार्यकर्त्या उमेदवारांना साथ देत आहेत. 
उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. गावपातळीवर प्रचार असो वा रॅली प्रत्येक ठिकाणी आमच्या लाडक्या उमेदवाराला मत द्या, असे आवाहन केले जात आहे. उमेदवारांसह मतदारांच्या भेटीगाठी, प्रचार पत्रकाचे वाटप, सोसायट्यांमध्ये जाऊन महिला मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करणे आणि घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे काम महिला कार्यकर्त्या करीत आहेत. 

सकाळी प्रचार रॅलीत, दुपारी भेटीगाठी, आणि सायंकाळी पुन्हा रॅली असा महिला कार्यकर्त्यांचा दिनक्रम बनला आहे. 25 वर्षे वयोगटातील युवतींसह 60 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ महिलाही प्रचारात सहभागी झालेल्या दिसत आहेत. उमेदवारांचे फेसबुक, व्हॉट्स अप, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरील अपडेट हाताळण्याचे काम महिला करीत आहेत. रोजच्या प्रचाराची क्षणचित्रे वेगवेगळ्या धाटणीत मांडणार्‍या कंटेंट रायटर महिलांचीही कमतरता नाही.  सध्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी डोअर टु डोअर कॅम्पेनिंग करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन निवडणुकीचा प्रचार केला जात आहे.
 

Tags : Belgaon, Election Campaign, Women lead Election