Mon, Jan 18, 2021 15:01होमपेज › Belgaon › सीमाभागात हवा मोठा दूध प्रकल्प

सीमाभागात हवा मोठा दूध प्रकल्प

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 7:54PMनिपाणी : राजेश शेडगे

सीमाभागातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय करीत आहेत. पण दुधाला योग्य दर मिळत नसल्याने अधिक उत्पन्न मिळत नसल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांतून व्यक्‍त होत आहे. सीमाभागात मोठा दूध प्रकल्प नसल्याने अधिक दूध महाराष्ट्रातील दूध संघांना दिले जाते. सीमाभागात मोठा दूध प्रकल्प  निर्माण झाल्यास शेतकर्‍यांना चांगला दूध दर मिळण्यासह रोजगार निर्मितीही होण्यास चालना मिळेल.दूधगंगा व वेदगंगेला बारमाही पाण्याची सोय असल्याने शेतीपाण्याचा प्रश्‍न सुटला असून दूध उत्पादन वाढीस चालना मिळाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावात खासगी दूध डेअरींकडून दूध संकलन करून कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ, वारणा, मोरणा, यळगूड, समृद्धी, शाहूसह विविध दूध संघांना पाठविले जाते. शिवाय सांगली जिल्ह्यातील काही दूध संघही दूध संकलित करतात. 

महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना  दिला जाणारा दर सीमाभागातील दुधाला मिळत नसल्याची तक्रार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन केले. सीमाभागातील दूध उत्पादकांनी महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आंदोलन यशस्वी होऊन महाराष्ट्र शासनाने गायीच्या दुधाला 25 रूपये दर देण्याचा निर्णय घेतला असून हा दर सीमाभागातील दुधाला मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सीमाभागातील दूध संकलन  झाल्यावर त्यावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणारा प्रकल्प नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. सहकार तत्त्वावर चालणारी एखादी मोठी संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध दूध संघांकडून म्हैशीच्या दुधाला फॅटवर आधारित दर दिला जातो. बेळगाव येथील केएमएफ ही संस्था गायीच्या दुधाचे निर्जंतुकीकृत करून पॅकिंगद्वारे विकण्याचे काम करते.

निपाणी तालुक्यात तंबाखूला पर्याय म्हणून सोयाबीन, ऊस व अन्य पिके  घेतली जात आहेत. उसामुळे जनावरांना चार्‍याची सोय होते. त्यामुळे गावागावात दूध उत्पादन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून काही सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंद्योगही मिळू लागला आहे. औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या सीमाभागात दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग झाल्यास तरूणांना रोजगार मिळणार आहे. शिवाय दूध उत्पादकांना चांगला दर मिळणे शक्य होणार आहे. दुभत्या जनावरांना संतुलित खाद्यपुरवठा करण्यासाठी छोटा पशुखाद्य कारखानाही सुरू करता येणे शक्य आहे. 

दूध दरातील तफावत दूर व्हावी

दूध संघाकडून सीमाभागावर अन्याय होत आहे. गेल्या दोन -तीन महिन्यापासून गायीच्या दुधाला महाराष्ट्रापेक्षा 5 ते 6 रूपये कमी दिले जात आहेत. दूध संघांनी 30 टक्के गायीचे दूध पाठविल्यावर 70 टक्के म्हशीचे दूध देणे बंधनकारक आहे. सीमाभागातून महाराष्ट्रातील गोकुळ, दत्त इंडिया, हनुमान, प्रतिभा मिल्क, वारणा, भारत, शाहू व समृद्धी दूध संघांना  दररोज सुमारे 40 ते 45 हजार प्रतिदिन दूध पाठविले जाते. निपाणी-कोल्हापूर अंतर कमी असताना दूध दरात तफावत ठेवून अन्याय केला जात आहे. हा अन्याय दूर होण्याची गरज आहे.