Thu, Jan 21, 2021 01:30होमपेज › Belgaon › ‘पासपोर्ट’ केंद्राला मुहूर्त कधी?

‘पासपोर्ट’ केंद्राला मुहूर्त कधी?

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 10:42PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहरात पासपोर्ट सेवा केंद्र हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. पासपोर्ट सेवा केंद्रासाठी केंद्र सरकारने परवानगी देऊन वर्षभराचा अवधी होत आला तरी केंद्र सुरू झालेले नाही. परराष्ट्र मंत्रालय किंवा राज्य सरकारकडून कोणतेही आदेश आले नसल्याने केंद्राला सुरुवात झाली नसल्याची माहिती डाक घर अधिकार्‍यांकडून देण्यात आली. 

मुख्य डाक कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावर केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी खा. सुरेश अंगडी यांनी मे महिन्यात अधिकार्‍यांची बैठक घेऊन महिनाभरात सुर करण्याचे आदेश दिले होते. मात्र सहा महिने झाले तरीही केंद्राला सुरुवात नाही. या ठिकाणी कर्मचारी निवड व कक्ष कामकाजाचे काम पूर्ण झाले असून कार्यालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 

शहराच्या स्मार्ट सिटीत भर घालणार्‍या पासपोर्ट केंद्राचे काम अजूनही रखडलेलेच असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. केंद्राच्या उद्घाटनास अजून किती दिवस लागतात, हा विषय नागरिकांत चर्चेचा बनला आहे. 

शहरात सध्या केंद्र नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. बेळगावकरांना हुबळीला हेलपाटे माराावे लागत आहेत. परिणामी वेळ व आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी त्वरित केंद्राची तारीख निश्‍चित करून कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.केंद्रासाठी उद्योजकांनी वारंवार पाठपुरावा केला.  अजूनही केंद्र सुरू न झाल्याने प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येते.