Thu, Sep 24, 2020 06:22होमपेज › Belgaon › रखवालदारावर हल्ला; पळवल्या म्हशी

रखवालदारावर हल्ला; पळवल्या म्हशी

Published On: May 27 2019 1:32AM | Last Updated: May 26 2019 11:32PM
बेळगाव/कडोली ः प्रतिनिधी  

अगसगे गावाबाहेर मुख्य रस्त्याला लागून असणार्‍या डेअरी फार्मवर चोरट्यानी दरोडा टाकून सुमारे पावणेदोन लाखांच्या दोन म्हशी पळविल्या. दरोडेखोरांनी म्हशी चोरून नेताना येथील रखवालदार अप्पय्या शेलार (वय 60, रा. अगसगे) यांनी प्रतिकार केला. परंतु, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून चोरट्यांनी डेअरी फार्मममध्ये अक्षरशः धिंगाणा घातला. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. 

कंग्राळी खुर्द येथील रहिवासी असणार्‍या प्रिया पुंडलिक सोमनट्टी या खासगी व्यावसायिक आहे. त्यांनी अगसगे येथे भाडेतत्त्वावर जमीन घेऊन सहा महिन्यांपूर्वी डेअरी फार्म  सुरू केला आहे. विविध राज्यांतील लाखो रुपये किमतीची दुभती जनावरे पाळली आहेत. लाखावर किंमत असलेल्या जातिवंत पाच म्हशी, एक गाय व वासरांसह एकूण 10 जनावरे येथील गोठ्यात आहेत. या ठिकाणी अपय्या शेलार हे रखवालदार म्हणून कामाला आहेत. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे जनावरांना चारा घालून ते झोपी गेले. मध्यरात्री 1.30 च्या सुमारास कोणीतरी दरवाजा ठोठावला. ओळखीचे कोणी असेल  असे समजून त्यांनी दरवाजा उघडला. मात्र  आत शिरतच दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत मारहाणीस सुरवात केली. जादा आवाज केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांचाही नाईलाज झाला. तरीही चोरट्यांनी त्यांना बांधून घालत त्यांच्या अंगावरील कपडे काढले, शिवाय तोंडात कापडी बोळा कोंबला. यानंतर चोरटे जनावरे घेऊन पसार झाले. रखवालदार शेलार यांनी जवळच असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे धाव घेतली. घडला प्रकार कानावर घातला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रात्रीच उचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. 

घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी काकती पोलिस निरीक्ष एल.  एच. गवंडी, उपनिरीक्षक अर्जुन हंचीनमनी यांनी भेट देऊन पाहणी केली.  श्‍वान पथकांकडून शोध घेण्यात आला. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी, ग्रामीण एसीपी शिवा रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. घटेची नोंद काकती पोलिस स्थानकात झाली आहे.

महिन्याभरात दुसरी घटना 

काही दिवसांपूर्वी आंबेवाडी येथील शेतकरी भैरू भातकांडे यांच्या जनावरांची चोरी झाली आहे. या प्रकरणी काकती पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर चोरट्यांनी अगसगेमध्येही धुमाकूळ  घातला आहे. त्यामुळे शेतवडीतील घरांमध्ये जनावरे पाळणार्‍या शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.