Sat, Feb 29, 2020 18:45होमपेज › Belgaon › निपाणी तालुक्यातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

निपाणी तालुक्यातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

Published On: Sep 20 2019 1:42AM | Last Updated: Sep 19 2019 8:36PM
निपाणी : प्रतिनिधी

ऑगस्ट महिन्यातील महापुरामुळे निपाणी तालुक्यात कोट्यवधींचे नुकसान झाले. तालुक्यातील 3,584 घरांची पडझड झाली असून अनेक जनावरे व कोंबड्या दगावल्या आहेत. 7 हजार 700 हेक्टरवरील ऊस पीक कुजून गेले आहे. आता सर्वेक्षण पूूर्ण होऊन शासनाकडे नुकसानीचा अहवाल पाठवला तरी अद्याप मदतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

महापुराचा फटका बसलेल्यांना सुरुवातीला तातडीची 3800 रूपये व नंतर 6200 रूपये अशी 10 हजार रूपयांची मदत देण्यात आली. पण, अजून घर व पीक नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. पूरग्रस्तांना शासनाने दिलेले  प्राथमिक स्वरुपातील अनुदान उपयोगी ठरून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पण, घरांचा आणि पिकांचा सर्व्हे होऊनही अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने पूरग्रस्त हवालदिल झाले आहेत.  अनेक गावांत पुरामुळे घरे पाण्याखाली गेल्याने घरातील टीव्ही, फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या आहेत. कपडे, घरगुती साहित्य, फर्निचरचेही मोठे नुकसान झाले आहे. शासनाने  दोन टप्प्यांत दिलेले अनुदान तोकडे पडले आहे. 

अंशतः  व पूर्ण पडलेल्या घरांना शासनाच्या नियमावलीनुसार भरपाई दिली जाणार आहे. सदर रक्कम तोकडी  मिळाल्यास पूरग्रस्तांना स्वतःजवळील किंवा कर्ज काढून घरांची दुरूस्ती करावी लागणार आहे. ऊस, सोयाबीन, भुईमूग व अन्य पिकांचेही अधिक नुकसान झाले आहे. राज्य व केंद्र शासनाने त्वरित पूरग्रस्तांना मदतनिधी देण्याची मागणी होत आहे.

महापुराचा फटका बसलेली गावे

कोगनोळी, सौंदलगा, भिवशी, अकोळ, गळतगा, भीमापूरवाडी, भोज, भोजवाडी, मांगूर, कारदगा, बेडकिहाळ, कुर्ली, भाटनांगनूर, बेनाडी, कुन्नूर, गजबरवाडी, बोळेवाडी, शिवापूरवाडी, चाँदशिरदवाड, आडी, हंचिनाळ, माणकापूर, कसनाळ, यमगर्णी, बुदिहाळ, पांगिरे-बी, जत्राट-श्रीपेवाडी, आप्पाचीवाडी, हदनाळ, मत्तीवडे, सुळगांव, शेंडूर, गोंदुकुप्पी, हुन्नरगी, सिदनाळ, ममदापूर के. एल., लखनापूर, पडलिहाळ, यरनाळ, तवंदी, अमलझरी, बारवाड, ढोणेवाडी, बोरगाव, बोरगाववाडी.