Fri, Nov 27, 2020 10:40वडगावच्या तरुणाचा मलप्रभेत बुडून मृत्यू

Last Updated: Nov 23 2020 2:05AM
खानापूर : पुढारी वृत्तसेवा

मलप्रभा नदी काठावर पर्यटनासाठी आलेल्या बेळगावमधील एका खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍याचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. मंजुनाथ मल्लिकार्जुन सातपुते (वय 27, रा. रणझुंजार कॉलनी, वडगाव, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. 

मंजुनाथ वडगावजवळील एका खासगी इस्पितळात एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून कामाला होता. रुग्णालयातील अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांसोबत तो पिकनिकसाठी खानापूरला आला होता. मलप्रभा व हलात्री नदी संगमाजवळ 200 ते 300 फूट अंतरावर मलप्रभा नदीपात्रात असलेल्या पिकनिक स्पॉटवर वैद्यकीय कर्मचार्‍यांचा चमू दाखल झाला. यापैकी काही जण नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले. 

मंजुनाथदेखील पोहण्यासाठी उतरला. दगडावरून काही अंतर गेल्यानंतर अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात बुडाला. लागलीच अन्य सहकार्‍यांना तो बुडाल्याची कल्पना आली. त्यांनी अग्निशमन दलाला माहिती देऊन मंजुनाथ शोध घेण्याचा  प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धा तासात पाण्यातून मंजुनाथला बाहेर काढले. पण तोपर्यंत नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा गुदमरून मृत्यू झाला होता. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सरकारी रुग्णालयात शवचिकित्सा करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंजुनाथ अविवाहित होता.

आठवडाभरातील दुसरी घटना

आठ दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी खानापूर शहरातील दोन तरूण बुडाले होते त्याच ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी बुडाल्याने पर्यटनासाठी खुणावणारे नदीपात्र पूर्णपणे असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.