Sat, Feb 29, 2020 18:18होमपेज › Belgaon › कत्तूरमध्ये मामा-भाच्यात उमेदवारीसाठी चुरस

कत्तूरमध्ये मामा-भाच्यात उमेदवारीसाठी चुरस

Published On: Feb 08 2018 1:43AM | Last Updated: Feb 07 2018 10:22PMबेळगाव ः महेश पाटील

स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांच्या विरोधात पराक्रम गाजविलेल्या वीरांगणा राणी कित्तूर चन्नमा यांचे संस्थान असलेल्या कित्तूर विधानसभा मंतदार संघातून यावेळी पहिल्यांदाच राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. 

माजी मंत्री व विद्यमान आमदार डी. बी. इनामदार आणि त्यांचे भाचे बाबासाहेब पाटील यांच्यामध्ये तिकीट मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. बाबासाहेब पाटील हे प्रसंगी भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याने भाजपचे माजी आ. सुरेश मारीहाळ यांची भूमिका काय राहणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

संभाव्य बंडखोरी मोडून काढण्याबरोबरच हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने महिलांना तिकीट देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याची चाचपणी सुरु असून प्रसंगी शेजारील धारवाड किंवा अन्य ठिकाणाहून उमेदवार आणला जाण्याची  शक्यता आहे. 

माजी जि.प.सदस्य बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेसला हात देवून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी जोरदार तयार चालविली आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर या मतदार संघातील सर्व चित्र पालटणार आहे. शिवाय काँग्रेस भाजपमध्येही बंडखोरीची शक्यता दिसून येत आहे. येत्या आठवडाभरात आपल्या उमेदवारीची घोषणा काँग्रेसने केली नाही, तर आपण वेगळा पर्याय निवडणार असल्याचे श्री. पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. मात्र, भाजपकडून त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध होत असून बंडखोरीची भाषा केली जात आहे. येत्या दोन दिवसात याबाबतच्या घडामोडी उघड होतील.

डी. बी. इनामदार यांचा पराभव करण्यासाठी बाबासाहेब पाटील यांना भाजपात आणून पुन्हा एकदा कमळ फुलविण्यासाठी भाजप पक्ष श्रेष्टींनी प्रयत्न चालविले आहेत. मामाच्या विरोधात भाच्याला उभे करण्याचा प्रयत्न भाजपने चालविला असला तरी याला भाजपातील निष्ठावंताकडून विरोध होत आहे. 

भाजपमधून माजी आ. सुरेश मारिहाळ, डीसीसी बँकेचे संचालक, माजी उपाध्यक्ष महांतेश दौड्डगौडा, बसनगौडा सिद्धरामनी हे भाजपातून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. याचप्रमाणे डॉ. जगदीश हारुगोप्पा यांच्यासह अन्यजणही भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी पक्ष श्रेष्ठींच्या संपर्कात आहेत. 

बंडखोरीची परिस्थिती पाहता भाजप आणि काँग्रेसमधील काही जणांनी महिला उमेदवारांची नावे पुढे केली आहेत. कारवारचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्याकडे उमेदवाराच्या निवडीचे अधिकार पक्षश्रेष्ठींनी दिलेले आहेत.  

निधर्मी जनता दलाकडे प्रभावी उमेदवार  नाही. त्यामुळे भाजप व काँग्रेसमध्ये होणार्‍या बंडखोरीचा लाभ उठविण्यासाठी निजदने प्रयत्न चालविला आहे.