Thu, Feb 20, 2020 16:15होमपेज › Belgaon › चोर्‍यांसाठी मुलांचा वापर

चोर्‍यांसाठी मुलांचा वापर

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jun 30 2018 11:06PMउगारखुर्द : वार्ताहर

उगारखुर्द येथे दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरतो. या बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन परगावातून प्रामुख्याने महाराष्ट्रातून येथे येऊन लहान मुलांचा वापर करून मोठ्या प्रमाणात चोर्‍या करण्यात येत असल्याचे काही घटनांवरून निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

लहान मुले गर्दीचा फायदा घेत  मोबाईल आणि खिशातील पर्स   सर्रास लंपास करतात. गुरुवार दि. 28 रोजी बाजारात गर्दीच्या ठिकाणी एका 14 वर्षे वयाच्या मुलाला पाकीट चोरताना पकडण्यात आले. त्याला भीती दाखवताच त्याने आपण एक मोबाईलही चोरल्याचे कबूल केले. ते पैशाचे पाकिट आणि मोबाईल त्यांच्याकडून घेऊन नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आले.

उगारखुर्द आठवडी बाजारात वरचेवर असे चोरीचे प्रकार घडत आहेत. 15 दिवसांपूर्वी अशाच एका मुलाला मोबाईल फोनची चोरी करताना पकडण्यात आले. त्याच्याकडून मोबाईल काढून घेऊन त्याच्या मालकाला परत करण्यात आला.

काही वर्षांपूर्वी उगारखुर्द बाजाराच्या दिवशी महिलांची टोळी चोर्‍या करण्यासाठी सक्रिय होती. जागरूक नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर हा प्रकार बंद झाला होता. आता गेल्या काही महिन्यांपासून बाजाराच्या दिवशी चोर्‍या करण्यासाठी मुलांचा वापर करण्याच्या प्रकाराचा सुळसुळाट वाढला आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी पोलिसांनी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.