Sat, Feb 29, 2020 11:55होमपेज › Belgaon › नियतकालिकांचा ‘बोलका’ वापर

नियतकालिकांचा ‘बोलका’ वापर

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 12:23AMबेळगाव : शिवाजी शिंदे

पुस्तकांनी गच्च भरलेली कपाटे...विविध नियतकालिकांची रेलचेल...आकर्षक भिंतीवर...वेगवेगळ्या नियतकालिकांचा केलेला कल्पक वापर... साहित्य, संस्कृतीविषयी भिंतीवर लिहिलेला मजकूर...सुविचार, थोरामोठ्यांचे लिहिण्यात आलेले सुबक विचार...हे चित्र आहे, मारुती गल्ली येथील वाचनालयाचे.23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जातो. जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म व स्मृतिदिन एकाच दिवशी. हा दिवस जगभरातील पुस्तकप्रेमींतर्फे पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

पुस्तके वाचकांना साद घालत असतात. ती आनंदाची उधळण करतात. यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुस्तकांची देवाण-घेवाण करणारी वाचनालये अधिक देखणी, बोलकी झाली तर आनंदात भर पडेल. याची  प्रचिती मारुती गल्ली येथील मनपाच्या वाचनालयात येते.याठिकाणी मराठी, कन्नड, हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषेतील असंख्य पुस्तके, नियतकालिके आहेत. रोज अनेक वाचक भेट देत असतात. शहराच्या मध्यवर्ती परिसरात वाचनालय असल्याने वाचकांची नेहमीच गर्दी असते. 

सदर वाचनालय जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून चालविण्यात येते. याचे मुख्य कार्यालय कोर्ट आवारात असून मारुती गल्ली येथे शाखा सुरू आहे.येथील वाचनालय विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्या कात्रणांचा वापर कल्पकतेने करून सजविले आहे. त्याचबरोबर रंग, स्केचपेन, फ्लोरोसेंट पेपर, थर्माकोलचा वापर केला आहे. भिंतीवर, रिकामी जागा, कपाटे, बीम यावर रंगरंगोटी केली आहे. यामुळे भिंती सजीव झाल्या असून वाचकांना साद घालतात.

प्रत्येक विभागात कलेचा वापर केलेला आहे. यामुळे वाचनालयाचा परिसर अतिशय देखणा आणि सुबक बनला आहे. याठिकाणी दैनिके, साप्ताहिके, मासिके यातून आलेल्या माहितीची मांडणी पद्धतशीरपणे केली आहे. थोरामोठ्यांचे विचार आकर्षक पणे लिहिले आहेत. यासाठी कॅलिग्रॉफी कलेचा वापर केला असून भिंती बोलक्या बनल्या आहेत. ठिकठिकाणी जगप्रसिद्ध भारतीय महिला व त्यांचे कर्तृत्व कथन करणारी माहिती पत्रके, ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यिकांची छायाचित्रे व माहिती, खेळाडूंची माहिती, जगप्रसिद्ध पुस्तकांची यादी, शहरातील प्रेक्षणीय स्थळांचा नकाशा यासारखे अनेक उपक्रम याठिकाणी राबविण्यात आली आहेत. यामुळेच वाचकांचे पाय वाचनालयाकडे वळत आहेत. याचप्रकारची सजावट कोर्ट आवारातील मुख्य शाखेतदेखील करण्यात आली आहे.

Tags : Belgaum, Use,  Speakers, Magazines