Fri, Oct 30, 2020 18:59होमपेज › Belgaon › रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन; कोरोनाने बळी जाणारे भाजपचे दुसरे खासदार!

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन; कोरोनाने बळी जाणारे भाजपचे दुसरे खासदार!

Last Updated: Sep 23 2020 9:54PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश चन्नबसप्पा अंगडी (वय 65) यांचे दिल्‍लीतील एम्समध्ये कोरोनामुळे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. घटनेचे वृत्त समजल्यानंतर बेळगावकरांना धक्‍काच बसला. काही मिनिटांतच सोशल मीडियावर वृत्त पसरले आणि सर्वचजण एकमेकांकडे अंगडी यांच्याबाबत निधनाबाबत खात्री करुन घेत होते.

सलग चारवेळा ते बेळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना दिल्‍लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण, उपचाराचा कोणताही उपयोग झाला नाही. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.

गेल्या शुक्रवारी सुरेश अंगडी यांनी कोरोना चाचणी केली असता ती  पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी ट्विटरवरून  कोरोना लागण झाल्याची माहिती दिली होती.  सुरेश अंगडी बेळगावमधून खासदार होते. त्यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. 

यापूर्वी केरळमधील भाजप खासदार अशोक गस्ती यांचे कोरोनाने निधन झाले आहे. सुरेश अंगडी यांच्या रुपाने कोरोनामुळे पहिल्या केंद्रीय मंत्र्यांचा बळी गेला आहे. सुरेश अंगडी यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यामुळे भाजपच्या दोन खासदारांचा कोरोनाने बळी गेला आहे. 

 "