बेटगेरी येथे दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

Published On: Sep 12 2019 8:43PM | Last Updated: Sep 12 2019 11:51PM
Responsive image


खानापूर : प्रतिनिधी
गणेश विसर्जनाची सर्वत्र लगबग सुरू असताना घरगुती ‘श्री’ मूर्तींचे गावातील तलावात विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना बेटगेरी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे सायंकाळी चारच्या सुमारास घडली. ओंकार रामलिंग सुतार (वय २२ वर्षे) आणि सागर बबन गुरव (वय१७, दोघेही राहणार बेटगेरी) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

गावातील कुस्ती आखाडा भरविण्यात येणाऱ्या तलावात घरगुती श्रींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. आपल्या घरातील श्री मूर्ती घेऊन हे तरुण विसर्जनासाठी तलावाजवळ गेले होते. यावेळी पाण्यात उतरलेल्या सागरला खोलीचा अंदाज न आल्याने तो खाली घसरला. काही वेळातच तो पाण्यात बुडू लागला. हे पाहताच काठावरील नागरिकांनी आरडाओरड केला. त्याला वाचविण्यासाठी ओंकार सुतार याने तलावात उडी घेतली. मात्र सागरला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी नागरिकांनी तलावात उतरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तासाभरानंतर दोघांचे शव बाहेर काढण्यात आले. 

सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे बेटगेरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ओंकार हा उत्कृष्ट कराटेपटू म्हणून परिचित होता. गोव्यातील केरी या ठिकाणी त्याने स्वतःचा कराटे प्रशिक्षणाचा क्लास सुरू केला होता. तर सागर हा वेळवट्टी (ता. बेळगाव) येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता.  दोघांच्या या अकाली अपघाती निधनामुळे दोन्ही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शवचिकित्सेसाठी मृतदेह खानापुरातील सरकारी इस्पितळात हलविण्यात आले आहेत.