Wed, Sep 23, 2020 20:58होमपेज › Belgaon › दोघा वाटमार्‍यांना अटक 

दोघा वाटमार्‍यांना अटक 

Published On: Apr 03 2019 1:43AM | Last Updated: Apr 03 2019 12:51AM
बेळगाव : प्रतिनिधी

रस्त्यात अडवून लुटणार्‍या दोघांना मंगळवारी रेल्वे पोलिसांनी अटक केली. उत्कर्ष सुनील वर्मा (20, रा. कोनवाळ गल्ली) व गिरीश सुरेश नायक (23, जुन्या पोस्ट ऑफिसजवळ कॅम्प) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल व रोकड असा 6 हजार 220 रूपयांचा ऐवज जप्त केला. 

याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेल्वेत काम करणारा शिवू संगाप्पा नायक सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास धारवाडहून रेल्वेने  बेळगावात आला. तो घरी जात असताना उपरोक्त दोघा संशयितांनी त्याला रस्त्यात अडविले. मारबडव करीत त्याच्याकडील मोबाईल व पाकीट काढून पळून गेले. या दोघांच्या तपासासाठी हुबळी रेल्वेचे उपअधीक्षक बी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव रेल्वे उपनिरीक्षक बी. टी. वालीकर यांनी एक पथक तयार केले होते. रेल्वे पोलिस पथकातील सिद्धारूढ पाटील, मंजुनाथ एम. बी. संगाप्पा कोट्याळ, शकंरानंद पुजारी, प्रभू गोणे, भीमाप्पा नायक यांनी या प्रकरणाचा तपास करून उपरोक्त दोघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल व पाकिट जप्त केले. न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली. 

आधीही लुटीच्या घटना 
रेल्वे व बसमधून रात्री-अपरात्री येणार्‍या प्रवाशांना रस्त्यात अडवून लुटण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. विशेषतः अंबाभुवन, रेल्वेस्टेशन परिसर याशिवाय सीबीटी व खडेबाजार परिसरात यापूर्वी अनेकांना लुटले आहे. बहुतांश घटनांचा पोलिसांनी छडा लावून वाटमार्‍यांना अटक केल्याने गेल्या सहा महिन्यापासून अशा घटना कमी झाल्या होत्या. परंतु रेल्वेतून येणार्‍या तरुणाला लुटल्याने असा प्रकार पुन्हा समोर आला आहे.