Tue, Jul 07, 2020 19:10होमपेज › Belgaon › हुबळी स्फोट प्रकरणी दोघांचे निलंबन

हुबळी स्फोट प्रकरणी दोघांचे निलंबन

Last Updated: Oct 28 2019 1:08AM

हुबळी : स्फोट झालेल्या ठिकाणी पाहणी करताना रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी. शेजारी पोलिस व इतर.हुबळी : प्रतिनिधी
रेल्वे स्थानकावर स्फोट प्रकरणी स्टेशन व्यवस्थापक आणि रेल्वे साहाय्यक पोलिस निरीक्षक अशा दोघांना निलंबित करण्यात आले आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी ही माहिती दिली.

रेल्वे स्थानकाची पाहणी करुन त्यांनी स्फोटाची माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, स्टेशन व्यवस्थापक वरुणकुमार दास आणि आरपीएफ ए एसआय मंजुनाथ कामत अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. घटनेचा तीन दिवसांत तपास करुन अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसी टीव्ही कॅमेर्‍यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर रेल्वेस्थानकांच्या सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहे. धोकादायक वस्तूंची वाहतूक थांबवण्यासाठी स्कॅनिंग यंत्रे बसवण्यात येणार आहेत.

स्फोटामध्ये हुसेबसाब हा चहा विक्रेता जखमी झाला होता. त्याच्यावर किम्समध्ये उपचार सुरु असून रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांनी त्याची भेट घेऊन विचारपूस केली. त्याला 50 हजार रु. मदत देण्याचे घोषित करण्यात आले.

स्फोटानंतर घटनास्थळावर सापडलेल्या वस्तू व इतर वस्तूंचे नमुने न्यायवैद्यक शाळेकडे पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल आल्यानंतरच स्फोटक नेमक्या कोणत्या प्रकारचे होते हे समजणार आहे. याविषयी अधिक बोलता येत नाही, अन्यथा तपासात अडथळा येणार असल्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री अंगडींकडून स्थानकाची पाहणी 
हुबळी : प्रतिनिधी
हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शनिवारी हुबळीला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी आलेले स्फोटक साहित्य नेमके कोणाचे, ते पुढे कुठे जाणार होते, यासह सर्व घटनांची सखोल माहिती घेण्याची सूचना त्यांनी रेल्वे पोलिस अधिकार्‍यांना केली. 

21 ऑक्टोबर रोजी रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटानंतर हा विषय राज्यभर चर्चेचा बनला आहे. शनिवारी मंत्री सुरेश अंगडी यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. हुबळीसह ज्या ठिकाणी संवेदनशील रेल्वे स्थानके आहेत, तेथे लगेज स्कॅनर बसविण्यात येतील. रेल्वे स्थानकात कोणीही संशयास्पद फिरत असेल, तर त्याची तातडीने चौकशी करा, आता घडलेल्या स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश अंगडी यांनी दिले. या स्फोटात जखमी झालेल्या तरुणाचीही अंगडींनी भेट घेऊन विचारपूस केली. रेल्वे खात्याकडून त्याला तातडीची 50 हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे.